मुसळधार पावसाने पुण्या-मुंबईसह महाराष्ट्राला झोडपले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
पाऊसामुळे पुण्यातील रस्त्यावर आलेले पाणी
पाऊसामुळे पुण्यातील रस्त्यावर आलेले पाणी

 

पुण्यात काल २५ जुलै रोजी पावसाने दाणादाण उडवली. शहरात मुसळधार पावसाने रौद्ररुप धारण केलं होतं. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याचं देखील पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर शहरात सखल भागामध्ये कमरेइतकं पाणी साचलं होतं. पुण्यात पावसामुळे काल एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलंय.

सहा जणांचा मृत्यू
पुण्यातील डेक्कन परिसरात पुलाची वाडी येथे शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं (Heavy Rain In Pune) आहे. तर कात्रज तलावात बुडून दोघांचा तर ताम्हिनी घाटात एक तरुणाचा मृत्यू झालाय. आज देखील पुणे जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलंय. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन देखील संबंधित प्रशासनाने केलंय.

पुण्यात मुसळधार पाऊस
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आदेश दिले आहेत. तसेच आज मुळशी, मावळ, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
पुण्यात सलग २ दिवस झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र दाणादाण उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले, झाडं पडली तर वाहनं पाण्यात वाहून गेल्याच्या घटना काल समोर आल्या आहेत. या मुसळधार पावसाने सहाजणांचा बळी (Rain Update) घेतलाय. शहरातील सिंहगड रोड भागात असलेल्या एकता नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. परिणामी नागरिकांना मीठ मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागला आहे. मुठा नदीजवळ असलेल्या भागात देखील पाण्याचा कहर पाहायला मिळाला. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना संबंधित प्रशासनाने दिल्या आहेत.