जागतिक संघर्षाचा दक्षिणी जगाला फटका - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
'जी-२०' संमेलनात बोलताना नरेंद्र मोदी
'जी-२०' संमेलनात बोलताना नरेंद्र मोदी

 

“जगाच्या विविध भागांत सुरू असलेल्या संघर्षामुळे दक्षिणेकडील जगासमोर अन्न, इंधन आणि खतांची टंचाई अशा भीषण समस्या निर्माण झाल्या असून 'जी-२०' च्या सदस्य देशांनी या समस्यांचे निराकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, " असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'जी-२०' देशांच्या संमेलनात आज पहिल्या दिवशी बोलताना मोदींनी एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य' ही घोषणा केली. या दोन दिवसांच्या संमेलनामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टार्मर हे सहभागी झाले आहेत.

"मागील वर्षी दिल्लीमध्ये झालेल्या संमेलनात अनेक जनकेंद्री निर्णय घेण्यात आले होते. या संघटनेचे अध्यक्ष ब्राझीलकडे सोपविण्याचा निर्णयही भारतामध्येच घेण्यात आला होता. सध्या जगामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे दक्षिणकडील देशांना अन्न, इंधन आणि खतांच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सगळे देश दक्षिणेकडील जगाच्या समस्या आणि त्यांच्यासमोरील आव्हाने यांचा विचार करत नाही तोवर आमच्या कोणत्याही चर्चा यशस्वी होऊ शकत नाहीत," असे मोदी यांनी नमूद केले. मोदींनी यावेळी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या फेरउभारणीचे आवाहन केले.

दिल्लीमध्ये झालेल्या संमेलनात आम्ही आफ्रिकी महासंघाला 'जी-२०' सदस्यत्व देऊ केले होते. आता ब्राझीलने भूक आणि गरिबीच्याविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी यावेळी देशात राबविण्यात येणाऱ्या पीक विमा योजनेबाबत देखील माहिती दिली. भारताने केवळ पोषण मूल्यावरच नाही तर वैश्विक अन्न सुरक्षेला देखील प्राधान्य दिले असल्याचे त्यांना
सांगितले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter