१०० दिवसांत प्रभावी प्रकल्प द्या - केंद्रीय सचिव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

केंद्रातील मोदी सरकारने आता तिसऱ्यांदा सत्तेवर येताच पहिल्या शंभर दिवसांमध्ये कामाचा ठसा उमटविण्याचा निर्धार केला असून यासाठी बड्या नोकरशहांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे किमान एक प्रभावी प्रकल्प निश्चित करा आणि त्याची कशापद्धतीने अंमलबजावणी करता येईल? हे देखील सांगा असे निर्देश या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

‘मोदी-३.०’ मध्ये मेगा प्रकल्पांची पायाभरणी होऊ शकते. केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना धोरणे ठरविताना आणि त्यांची अंमलबजावणी करताना ‘सरकार म्हणून आपण एक आहोत’ असा विचार केला पाहिजे अशी सूचना केली. अल्प कालावधीमध्ये भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी काही ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहेत. प्रत्येक मंत्रालय आणि विभागांनी किमान एका प्रभावी प्रकल्पावर काम करावे असा आग्रह खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच धरला आहे. सर्व मंत्रालये आणि विभागांनी पहिल्या शंभर दिवसांमध्ये प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या घ्यावात आणि वेगाने पावले टाकावीत असेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

लोकांचा विचार करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२२ मध्ये ‘पंचप्राण’ ठरावांची घोषणा केली. त्यानुसार प्रत्येक विभागाला प्रकल्पांसाठी नव्या सूचना आणि संकल्पना सुचविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक विभागाला त्यांचे काम अधिक लोकाभिमुख पद्धतीने करण्याची सूचना करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांच्या सोयी-सुविधांना अधिक प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे.

सरकार म्हणते
  • सरकारी नियम, कायद्यांत सुसूत्रता आणली जावी
  • सरकारी संकेतस्थळे अधिक यूजर फ्रेंडली हवीत
  • ‘जल जीवन’चा नागरिकांवरील प्रभाव अभ्यासा
  • क्षमता विकासासाठी अधिकाऱ्यांना योग्य मोबदला द्यावा
  • सरकारी संगणकीय प्रणालीस योग्य सायबर संरक्षण हवे
 
तरुणांना संधी द्यावी
राष्ट्र उभारणीच्या कामाध्ये तरुणांना योग्य संधी मिळावी यासाठी ‘माय भारत’, ‘नॅशनल सर्व्हिस स्कीम’ (एनएसएस), ‘नॅशनल कॅडेट कोअर’ (एनसीसी), ‘भारत स्काउट्स आणि गाइड्स’ यांच्यासारख्या उपक्रमांमध्ये अधिक सुसूत्रता आणली जावी असेही सांगण्यात आले आहे. महिलाकेंद्री विकासासाठी देखील सर्वसमावेशक आराखडा तयार करा असे सांगण्यात आले आहे.

‘अर्थसंकल्प लोकांपर्यंत पोचवा’
अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या विविध घोषणांची कालबद्धरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी बजेट वेबिनारचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्व घटकांना सामावून घ्यायला हवे असे सरकारचे म्हणणे आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला नेमके किती मनुष्यबळ लागेल? याचा विविध विभाग आणि मंत्रालयांनी आतापासूनच विचार करावा असेही गौबा यांनी सूचित केले आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter