नुकसान परक्यांपासून नव्हे आप्तांपासून होते. त्या गद्दारांचा चेहरा समोर आला. त्यांच्यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. मुस्लिम समाजासाठी निष्ठेने लढलेल्यांचा विकल्या न गेलेल्यांचाही चेहराही जनतेसमोर आहे.
त्यामुळे येत्या महापालिका निवडणूकीच्या कामाला लागा. समाजाची सेवा करा त्यांचा आवाज बना. समाज म्हणेल त्याला उमेदवारी देवू फक्त एकजुटीने लढा. पण आत्तापासून कोणीही स्वतःहूनच दावेदार समजू नका. असे एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीने औवेसी म्हणाले.
मजनू हिल येथील मौलाना अबुल कलाम आझाद येथे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची तसेच आजी माजी लोकप्रतिनीधींचा मेळावा रविवारी (ता. १) दुपारी पार पडला. त्यावेळी खासदार औवेसी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी महापालिकेसाठी कार्यकर्त्यांत स्फुरण फुंकले. ते म्हणाले, २०११-१२ मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रातून एमआयएम या शहरात आली होती. निकाल आपल्या बाजून नसला तरी माझा निर्धार पक्का आहे. तुम्हीही निर्धार पक्का ठेवा. ते लोक आज एमआयएमसोबत नाही. ते नाहीच्या बरोबर झाले आहेत.
त्यांचा विचार करू नका. निवडणूकीत काम न केलेल्यांनाही काही बोलू नका. ते कोण आहेत हे मला माहीत आहे. समाज जेव्हा त्यांच्यावर डोळे वटारेल तेव्हा त्याचा थेट कार्यक्रम होईल. तुम्ही फक्त समजाच्या प्रत्येक सुखा दुखात धावून जा. एमआयएम निवडणूकीत हरली असली तरी हे सभागृह आज भरलेला आहे.
मी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यावर विश्वास ठेवतो. त्या गद्दारांवर आता विश्वास ठेवता येणार नाही. यावेळी नासेर सिद्धीकी, शारेक नक्षबंदी, समीर साजेद बिल्डर, मुन्शी पटेल, रहिम पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘मुस्कुराओ मेरे दोस्त....’
लोकसभेच्या निकालानंतर ‘त्या’ गद्दाराला पुर्व मतदार संघातून तिकीट द्यायचे नाही असा निर्णय मी घेतल्यावर दुबईत इम्तियाज जलिल यांना लढण्याची तयारी करण्यासाठी बोललो. त्यावेळी त्यांनी गुगली टाकण्याचा प्रयत्न केला.
पण, मी ते होऊ दिले नाही. त्यांचा मुलगा बिलाल खुप हुशार आहे. त्यांनी लोकसभेचा पराभव पचवून चार महिन्यात विधानसभेची तयारी केली. हे इतके सोपे नव्हते. पण, इम्तिजाय जलील एकदा वादा केल्यावर मागे हटत नाही. ‘इम्तियाज जलिल साब, मुस्कुराओ मेरे दोस्त....’ म्हणत कौतुक केले. त्यावेळी सभागृहात पानावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
धर्मगुरू सज्जाद नोमानी यांच्याविषयी काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?
या सभेत असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मगुरू सज्जाद नोमनी यांच्यावर नाव न घेता टीका केली. विधानसभा निवडणुकीत नोमनी यांनी २८८ मतदारसंघातील विशिष्ट उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र अपवाद वगळता सर्वत्र त्यांनी एमआयएमच्या उमेदवारांना पाठिंबा न देता समाजवादी पार्टीच्या मुस्लिम उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यांच्या या विरोधी भूमिकेमुळे एमआयएमला जोरदार फटका बसल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी म्हणतात, “या निवडणुकीत काही धर्मगुरूंनी आमच्या उमेदवाराच्या विरोधातील समाजवादी पार्टीच्या उमेदवाराची शिफारस केली. परंतु त्या उमेदवाराच्या तुलनेत एमआयएमच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मते मिळाली. अनेक मतदारसंघात पक्षाला दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरची मते मिळाली आहेत.”
पुढे ते म्हणतात, “तुम्हाला राजकारण करता येत नसेल तर करू नका. मुस्लिम समाजासाठी दुआ करा. तुम्ही जी काही भूमिका घेत आहात ती मुस्लिमांच्या हिताची नाही. तुमची दुश्मनी माझ्याशी किंवा एमआयएम पक्षाशी असू शकते. पण तुम्ही समाजाला त्रास होईल असे कृत्य नका.”
भ्रमात राहू नका, ही मते औवेसी बंधुंची ः इम्तियाज जलील
इम्तियाज जलील म्हणाले, ॲट्रोसिटी आणि निवडणूकीच्या दिवशीचा एक गुन्हा माझ्यावर दाखल झाला. पद गेले म्हणून मी घाबरेल असे त्यांचे मत असेल. पण, लढणाऱ्यांचे नाव एमआयएम आहे. चुकलो तर मान खाली घालून ते मान्य करू.
मात्र, कुणाच्या दबावाने माझ्यावर आणि माझ्या सहकार्यांवर कारवाईचा प्रयत्न झाला तर लक्षात ठेवा आम्ही रस्त्यावर उतरलो तर कसर ठेवत नाही. मला आणि नासेर सिद्धीकीला मिळालेली मते ही असुदोद्दीन औवैसी आणि त्यांच्या बंधुंची आहेत. त्यामुळे कोणी पण इच्छुक उमेदवाराने भ्रमात राहू नये. लोकांत राग आहे. तो राग महापालिका निवडणूकीत एकजूटीने दाखवा.