आता मिळणार हवामानाचा अचूक अंदाज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
आता मिळणार हवामानाचा अचूक अंदाज
आता मिळणार हवामानाचा अचूक अंदाज

 

इस्रोचे अंतरिक्ष उपयोग केंद्र- कृषी विद्यापीठात सामंजस्‍य करार
 
परभणी ः मराठवाड्यातील हवामानाचा अचूक अंदाज मिळण्यासाठी आता इस्त्रोची मदत मिळणार आहे. इस्त्रोच्या अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज घेतला जाणार असून, त्याचा फायदा मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्‍थेचे (इस्रो) अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यात नुकताच याबाबत सामंजस्य करार झाला.
 
या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांना मोठा फायदा होणार आहे. मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अचूक व काटेकोरपणे कृषी हवामान अंदाज व त्‍यावर आधारित कृषी सल्‍ला सेवा तत्‍परतेने व प्रभावीपणे देणे शक्‍य होणार आहे. परभणी विद्यापीठ विभागवार आणि जिल्हानिहाय कृषी हवामान सल्ला तयार करण्यासाठी उपग्रहाकडून प्राप्‍त विविध स्‍वरूपाची आकडेवारीचा लाभ होणार आहे. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनासही याचा लाभ होणार आहे. परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना विभागावर आणि जिल्हा स्तरावर २०१९ पासून स्थानिक कृषी सल्‍ला तयार करते. यास अधिक बळकटी प्राप्‍त होईल. या कराराचा लाभ विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांचे संशोधन कार्य आणि शेतकऱ्यांना होणार आहे.
 
कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणी आणि अंतरिक्ष उपयोग केंद्राचे संचालक डॉ. नीलेश देसाई यांनी अहमदाबाद येथे करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या. यावेळी बीपीएसजीचे समूह संचालक डॉ. बिमलकुमार भट्टाचार्य, परभणीचे कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे, बीपीएसजीचे डॉ. राहुल निगम, अँटेना विभागाचे ग्रुप डायरेक्टर डॉ. मिलिंद महाजन, ग्रुप डायरेक्टर डॉ. रश्मी शर्मा, डॉ. गायत्री, डॉ. डी. आर. रजक, डॉ. मेहूल पंड्या, विवेक पांडे, अमित जैन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
 
अचूक हवामान अंदाज व त्‍या आधारे ठोस कृषी सल्‍ला तालुकानिहाय शेतकरी बांधवापर्यंत पोचविण्‍याची आवश्‍यकता आहे. भविष्‍यात कृषी क्षेत्रात अंतराळ विज्ञानाच्या मोठा वापर होणार असून, अहमदाबाद अंतरिक्ष उपयोग केंद्राच्‍या माध्‍यमातून परभणी कृषी विद्यापीठात संशोधनात्‍मक केंद्र स्‍थापन होणे गरजेचे आहे.
- डॉ. इंद्र मणी, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
 
सामंजस्य करारामुळे अंतरिक्ष उपयोग केंद्र व परभणी कृषी विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त संशोधन कार्यास चालना मिळणार आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि शेतकरी बांधव यांना लाभ होईल. अचूक हवामान अंदाजाकरिता इस्रोकडील उपग्रह प्राप्‍त आकडेवारी अत्‍यंत उपयुक्‍त ठरेल.
- डॉ. नीलेश देसाई संचालक, अंतरिक्ष उपयोग केंद्र