यवतमाळच्या आबिद शेख यांना प्रतिष्ठेचा गदिमा पुरस्कार जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
आबिद शेख
आबिद शेख

 

'समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणे मी पेरले पिलांच्या चोचींमधील दाणे'

घरातील चिल्यापिल्यांचा घास असलेल दाणे शेतकरी काळ्या आईच्या कुशीत पेरतो. ढगांनी हे साधेसुधे बियाणे समजून वादाखिलाफी करू नये अशी काळजाला हात घालणारी मराठी गज़ल लिहिणारे महागाव तालुक्यातील सवना येथील शेख आबिद शेख मन्सूर यांच्या 'चोचींमधील दाणे" या मराठी गज़ल संग्रह अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा यावर्षीचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. हृदयाला हात घालणारी शेख आबिद यांची गज़ल केवळ कल्पनेची भरारी नाही. कोर चतकोर भाकरीसाठी वाट्याला आलेली फरफट शेख आबिद यांच्या गज़लांची प्रेरणा झाली, त्यांची अकृत्रिम गज़ल म्हणूनच सर्वव्यापी झाली,आणि तिला लोकमान्यताही आहे.

यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील सवना हे शेख आबिंद यांचे जन्मगाव.  वडील शेख मन्सूर डोक्यावर टोपली घेऊन खेडोपाडी स्टेशनरीच्या वस्तू विकून कुटुंबाचा गाडा ओढतात. प्राथमिक, शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण सवना येथेच झाले. आबिद यांना शिक्षणाने पदवी दिली मात्र पोटाच्या भूकेचे प्रश्न पदवीला सोडविता आले नाही. आतडीची ठणक आणि बेरोजगारीने शेख आबिद यांच्या अंतस्थ प्रतिभेला नवा आयाम दिला. आबिद यांना मुळात मराठी गज़ल सापडली ती गज़लनवाज भीमराव पांचाळे यांच्यामुळे.
 
भीमराव पांचाळे यांच्या आरस्पाणी स्वरातून गज़ल थेट आविदच्या काळजात झिरपली आणि चारोळीतील पंच दोन ओळीच्या शेरातही तेवढ्याच उत्कटतेने मांडता येतो ही कस्तुरी शेख आबिद यांना सापडली. हीच त्यांच्या गज़ल मुशाफिरीची मुहूर्तमेढ. शेख आबिद यांची गज़ल पांचाळे यांनी देश, विदेशात मंचावर गायली. त्यामुळे गज़ल प्रांताला शेख अबिद नावाच्या नव्या झंझावताचा परिचय झाला. सवना येथे आबिद यांचे चप्पल, बूट विक्रीचे अगदी छोटे दुकान होते. या दुकानावरच उपजीविका चालायची. कोरोनाने पुढे तेही बंद पाडले. सुचलेला शेर विसरू नये म्हणून शेख आबिद चप्पल बुटांच्या खोक्यावरच तो लिहन काढायचे. ही गझलसाधना त्यांना खूप पुढे घेऊन गेली. समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणे हा सिग्नेचर शेर मराठी गज़ल प्रांताने डोक्यावर घेतला. शेख आबिद यांची पहिली गज़ल गाऊन भीमराव पांचाळे यांनी स्वतःच्या सत्काराची शाल. गदिमा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने शेख आबिद यांच्या प्रतिभेचा गौरव होत असून यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

"सुगंधी बाग आहे ती" ही त्यांची मराठी गज़लांची सीडी प्रसिध्द आहे.मराठी गजल "सुरेश भटा नंतर ... या प्रातिनिधिक गजल संग्रहात गजलांचा सामावेश आहे. तसेच "चोचींमधील दाणे" हा मराठी गजल संग्रह प्रसिध्द आहे.