G20 : पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजधानी सजली

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 1 Years ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नवी दिल्ली : दोन दिवसांवर आलेल्या जी-२० परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला गेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन उद्या भारतात येण्याची शक्यता आहे. अन्य राष्ट्रप्रमुख मात्र शुक्रवारी (ता. ८) राजधानीत दाखल होतील.

 

येत्या ९ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या परिषदेचे यजमानपद दोन दशकांनंतर भारताला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेमध्ये प्रामुख्याने आर्थिक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

जी-२० देशांच्या प्रमुखांसह इतरही देशांचे प्रमुख व आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी असे ४० देशांचे मान्यवरांची मांदियाळी दिल्लीत राहणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी जी-२० परिषदेच्या सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

 

तीन व्हीआयपी लाऊंज
दिल्ली विमानतळावर तीन व्हीआयपी लाऊंज उभारण्यात आले आहेत. तेथे राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करण्यात येईल. हा सर्व समारंभ भारतीय पद्धतीने केला जाणार आहे. हस्तकौशल्याने तयार केलेल्या दुपट्टा प्रदान करून तसेच भारतीय पद्धतीने औक्षण केले जाणार आहे. कपाळावर टिळा लावण्यात येईल.

 

राष्ट्रप्रमुखांसोबत येणाऱ्या अधिकाऱ्यांना व्हिसाबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश पी. के. मिश्रा यांनी दिले. राष्ट्रप्रमुखांच्या आगमनामुळे येत्या ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या काळात दिल्लीत येणारी व जाणारी अशी १६० विमाने रद्द केली आहेत. ज्या प्रवाशांनी या काळातील विमानप्रवासाचे बुकिंग केले आहे. त्यांना परतावा केला जाईल, असे विमान कंपन्यांनी म्हटले आहे.

 

हॉटेलभोवती सुरक्षा कडे
दिल्लीतील बहुतेक पंचतारांकित हॉटेलमध्ये आतापासून सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ल मेरीडियन, हॉटेल ताज, मौर्य शेरेटन, हॉटेल अशोका या हॉटेलभोवती सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. या हॉटेलमध्ये जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

 

हॉटेलमध्ये दक्षिण-पूर्व आशियन, आखाती व पौवार्त्य देशातील खाद्य पदार्थ तयार केले जाणार आहेत. भारतीय खाद्य सुद्धा पाहुण्यांना दिले जाणार आहे. परंतु पाहुण्यांच्या सवयी व रुचीनुसार त्यांनी पदार्थ पुरविले जाणार आहे. भारतातील श्री अन्न व भरडपासून तयार केलेली पदार्थांचा आस्वाद पाहुण्यांना घेता येईल.

 

बनावट व्हिडिओ व्हायरल
जी-२० परिषदेच्या एका ठिकाणी शीख फॉर जस्टिस या प्रतिबंधित संघटनेने काही फलक लावल्याचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही संघटना खलिस्तान समर्थक मानली जाते. परंतु ‘पीआयबी’ने दिलेल्या माहितीनुसार असे कोणतेही पोस्टर लावण्यात आलेले नसून तो व्हिडिओ बनावट असल्याचे पीआयबीच्या फॅक्ट चेक विभागाने स्पष्ट केले आहे.

 

मेट्रोची ३९ स्थानके बंद राहणार
८ ते १० सप्टेंबर काळात दिल्लीतील ३९ मेट्रो स्टेशन बंद राहणार आहेत. यात इंदिरा गांधी विमानतळाकडे जाणारे सर्व मेट्रो स्टेशन बंद राहतील. केवळ टर्मिनल ३ व टर्मिनल १ वर मेट्रोद्वारे थेट प्रवाशांना जात येईल.

 

याशिवाय खान मार्केट, जनपथ, केंद्रीय सचिवालय, कैलाश कॉलनी, बाराखंबा रोड, आश्रम, जंगपुरा, आयआयटी, हौजखास, सर्वोच्च न्यायालय, लोककल्याण मार्ग, आयटीओ व चांदणी चौक यासारखे महत्त्वाचे मेट्रो स्टेशनही बंद राहणार आहेत.

 

परिषदेसाठी सहकार्य करू: चीन
जी-२० परिषदेचे आयोजन करण्यासाठी आम्ही भारताला समर्थन दिले होते आणि यानंतरही ही परिषद यशस्वी होण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असे चीनने आज स्पष्ट केले. येत्या आठवड्यात नवी दिल्लीत होणाऱ्या या परिषदेला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे येणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर चीन सरकारतर्फे हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आज पत्रकार परिषदेत चीन सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘‘जी-२० गटाच्या परिषदेला आम्ही कायमच महत्त्व दिले असून या गटाच्या कामकाजात आम्ही सक्रिय आहोत. ही परिषद भारतात आयोजित करण्यासाठी आम्ही भारत सरकारला समर्थन दिले होते.

 

परिषद यशस्वी होण्यासाठीही आवश्‍यक ते सहकार्य करू. जी-२० हे आर्थिक सहकार्यासाठीचे व्यासपीठ आहे. भारत आणि चीन यांचे संबंध स्थिर असून विविध पातळ्यांवर आमच्यात संवाद प्रक्रिया सुरु आहे,’’ असे प्रवक्त्यांनी सांगितले.

 

हे सांगताना त्यांनी भारत-चीन सीमावादाचा उल्लेख टाळला. जी-२० परिषदेला अमेरिका, जपान, सौदी अरेबिया यांच्यासह विविध देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

 

तिबेटींची निदर्शने रद्द
जी-२० परिषदेदरम्यान चीन सरकारचा निषेध करण्याचा निर्णय भारतात राहणाऱ्या तिबेटी नागरिकांनी रद्द केला आहे. चीनचे अध्यक्षच या परिषदेला येणार नसल्याने निदर्शने रद्द करत असल्याचे तिबेटच्या विजनवासातील संसदेचे सदस्य दवा त्सेरिंग यांनी सांगितले. त्सेरिंग यांनी जिनपिंग यांच्यावर जोरदार टीकास्त्रही सोडले.

 

ते म्हणाले,‘‘जिनपिंग हे तिबेटी लोकांचा छळ करत आहेत. विद्यार्थ्यांना तिबेटी भाषेत शिकण्यास मनाई करण्यात आली आहे. एखाद्याला भिक्खू व्हायचे असल्यास त्यालाही मनाई आहे. हा सांस्कृतिक हल्ला आहे.’’