G20 शिखर परिषदेत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याविषयी गौरवोद्गार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
 छत्रपती शिवरायांचा उल्लेख असलेली बुकलेट मधील पाने
छत्रपती शिवरायांचा उल्लेख असलेली बुकलेट मधील पाने

 

गेल्या आठवड्यात G२० ची शिखर परिषद संपन्न झाली. यावर्षीचं अध्यक्षपद भारताकडे असल्यामुळे, देशभरात या परिषदेच्या कित्येक बैठका आणि सत्रं पार पडली. या परिषदेची सांगता दिल्लीमधील मुख्य बैठकीने झाली. यावेळी जगभरातील उपस्थितांना भारताचा समृद्ध इतिहास दर्शवणारं एक बुकलेट देण्यात आलं. विशेष म्हणजे या बुकलेटमध्ये  छत्रपती शिवरायांचा आणि स्वराज्याचा उल्लेख करण्यात आला.

'भारत : दि मदर ऑफ डेमोक्रसी' असं या बुकलेटचं नाव आहे. यामध्ये भारताचा हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास दाखवण्यात आला आहे. याची सुरुवात सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील एका मूर्तीने होते. 'डान्सिंग गर्ल' नाव दिलेली एक मूर्ती उत्खननात मिळाली होती. ही सुमारे ५००० वर्षं जुनी असल्याची मानलं जातं.

यासोबत या बुकलेटमध्ये भारतातील राजेशाही, आणि लोकशाही कशी होती याबाबत माहिती देण्यात आली आहे. अयोध्येमध्ये दशरथानंतर जेव्हा नवीन राजा निवडायचा होता, तेव्हा राजा दशरथाने आपल्या दरबारातील लोकांचं मत - जे जनतेचेप्रतिनिधी होते - विचारात घेतलं होतं. त्यांच्या एकमतानेच रामाची नवीन राजा म्हणून निवड करण्यात आली होती, असंही यात म्हटलं आहे.

या बुकलेटमध्ये जैन, बौद्ध अशा इतर धर्मांची शिकवण देखील सांगण्यात आली आहे. सोबतच कौटिल्यांच्या चाणाक्य नीतीमध्ये राजा कशा प्रकारे जनतेचा सेवक असतो, याबाबत माहिती दिल्याचं यात म्हटलं आहे. दक्षिण भारतात देखील कित्येक शीलालेखांमध्ये लोकशाहीचं समर्थन करणारे लेख आढळले आहेत.

अकबराची लोकशाही
या बुकलेटमध्ये मुघल सम्राट अकबराचा देखील उल्लेख आहे. अकबराने विश्वशांतीचा संदेश देत, धार्मिक भेदभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले. तसंच, अकबराची लोकशाही विचारसरणी ही काळाच्या बरीच पुढची होती असं यात म्हटलं आहे.

शिवछत्रपतींचं स्वराज्य
या बुकलेटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा देखील उल्लेख आहे. लोककल्याणासाठी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तसंच, रयतेचा कारभार पाहण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची केलेली स्थापना याबाबत देखील उल्लेख करण्यात आला आहे.

भारत सर्वात मोठी लोकशाही
यानंतर या बुकलेटमध्ये भारताच्या संविधानाचा उल्लेख आहे. सोबतच भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचंही यात सांगण्यात आलं आहे. तुम्ही इथे क्लिक करून हे संपूर्ण बुकलेट वाचू शकता