आसाम आणि अरुणाचलमध्ये पुरामुळे हाहाकार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 3 d ago
आसाम पूर परिस्थिती
आसाम पूर परिस्थिती

 

देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे, तर ईशान्य प्रदेश मात्र त्याच्या तडाख्यात गुरफटत आहे. आसाम आणि अरुणाचलमधील लोक गेल्या एक महिन्यापासून पुराशी झुंज देत आहेत, ते तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहत आहेत. आसाममध्ये 3 लाखांहून अधिक लोक बाधित झाले असून आतापर्यंत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

संततधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, काही दिवसांपासून शांत झाल्यानंतर रविवारी पुन्हा पुराने उग्र रूप धारण केले.

नागाव, दिब्रुगडसह डझनभर जिल्हे पाण्यात बुडाले आहेत. लोकांची घरे गुडघाभर पाण्यात आहेत. एनडीआरएफचे पथक त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत. गुजरातमधील सुरतमध्येही या वादळामुळे मोठा विध्वंस झाला. मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने अनेक रस्ते बंद आहेत.

आसाममधील पूरस्थिती गंभीर होत असून काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्हमधील 233 वन शिबिरांपैकी 26 टक्क्यांहून अधिक पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर भारत-चीन सीमेवरील अनेक भागांचा रस्ता संपर्क तुटला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या १२ वरून १९ झाली आहे. इटानगरमध्ये मुसळधार पावसामुळे 2 ते 6 जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान या पावसाळ्यात जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम हिमालयातील राज्ये आणि मध्य भारतातील नदीकाठच्या भागात पुराचा धोका निर्माण होणार आहे.

भारतीय हवामान खात्याने सोमवारी हा अंदाज व्यक्त केला होता. जून महिन्यात सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस झाल्याचेही सांगण्यात आले.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जुलैमध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की ईशान्य भारतातील अनेक भाग आणि वायव्य, पूर्व आणि आग्नेय द्वीपकल्पीय भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात सामान्य आणि सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

आयएमडी प्रमुख पुढे म्हणाले की, पश्चिम हिमालयातील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाच्या अंदाजाचा अर्थ असा आहे की हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीर तसेच पश्चिम हिमालयाच्या पायथ्याशी जास्त पाऊस पडेल.

अरुणाचल प्रदेशात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व नद्या दुथडीभरून वाहत असून त्यांनी धोक्याची रेषा ओलांडली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पूर्व कामेंग जिल्ह्यातील सेप्पा या गावातील अनेक घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. राज्याची राजधानी इटानगर येथील विभाग सहामध्ये झालेल्या भूस्खलनाने अनेक इमारती आणि नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे रविवारी येथील कुरुंग पूलही वाहून गेल्याने कुरुंग कुमे जिल्ह्याचा संपर्क तुटल्याचे कोलोरिआंगचे आमदार पानी ताराम यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील नामसाई जिल्हा आणि लोहित जिल्ह्यातील वाक्रो मंडलाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील मिळून ४४ गावांना पुराचा फटका बसला आहे.

पूर्व सिंयांग जिल्ह्यातील सियांग नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत मुसळधार पावसामुळे वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पासीघाट-यिंगकिओंग आणि पासीघाट-आलो या महामार्गांवर भूस्खलनामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे. पूर्व सियांग जिल्ह्यातील पासीघाट, रुकसीन, मिरेम आणि बिलात येथील सखल भागातही पुराचे पाणी आले आहे.

रेल्वेमार्गाच्या कामावरही परिणाम
अरुणाचल प्रदेशातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुरुकोंगसेलेक-पासीघाट या रेल्वेच्या मार्गाच्या कामावरही मुसळधार पावसाचा परिणाम होत असून या मार्गाच्या बांधकामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान अरुणाचलमधील चांगलांग, नामसाई, लोहित यांसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तविला आहे.