जम्मू-काश्मीर : LoCवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

Story by  Pradnya Shinde | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करत पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. याला भारतीय लष्कराने कठोर प्रत्युत्तर देत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानी लष्कराला मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानकडून कृष्णा घाटी सेक्टरमध्ये करण्यात आलेला हा गोळीबार मंगळवारी झालेल्या आयईडी स्फोटानंतर झाला, ज्यामध्ये जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर नियंत्रण रेषेवरील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे.

पाकिस्तानी सैनिकांचे मोठे नुकसान, भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर
अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी तारकुंडी भागात भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू केला. भारतीय लष्करानेही तातडीने प्रत्युत्तर देत कठोर कारवाई केली, ज्यात पाकिस्तानी लष्कराला मोठे नुकसान झाले. पाकिस्तानकडील हानीबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही, परंतु अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, भारतीय लष्कराचा एक कनिष्ठ आयोगित अधिकारी (JCO) गस्त घालताना लँडमाईनचा स्फोट होऊन जखमी झाला. मेंढर येथील रहिवासी असलेल्या या अधिकाऱ्याला तातडीने लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले.

एलओसीवरील तणाव वाढला, वर्षातील पहिल्या संघर्षाची नोंद
फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तानने नव्याने शस्त्रसंधी करार केला होता, त्यानंतर नियंत्रण रेषेवरील संघर्षाच्या घटनांमध्ये मोठी घट झाली होती. मात्र, या वर्षातील हे पहिले शस्त्रसंधी उल्लंघन असून गेल्या पाच दिवसांत चौथी सीमावर्ती चकमक आहे.

१० फेब्रुवारी: राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये एलओसीवरील एका चौकीवर तैनात असलेला भारतीय जवान शत्रूच्या गोळीबारात जखमी.
८ फेब्रुवारी: कृष्णा घाटी सेक्टरमध्ये अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या गस्त पथकावर हल्ला केला.
४-५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री: कृष्णा घाटी सेक्टरमधून घुसखोरी करताना काही अतिरेकी लँडमाईनच्या स्फोटात जखमी.
३१ जानेवारी: पुंछ जिल्ह्यातील अतिरेकी घुसखोरीविरोधी मोहिमेत दोन घुसखोर ठार.
१४ जानेवारी: राजौरीमधील एका गावात लँडमाईन स्फोटात सहा भारतीय सैनिक जखमी.

भारतीय लष्कराकडून परिस्थितीवर लक्ष, उच्चस्तरीय बैठक आयोजित
गेल्या काही दिवसांतील वाढत्या चकमकींच्या पार्श्वभूमीवर जम्मूतील व्हाइट नाईट कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) लेफ्टनंट जनरल नवीन सचदेवा यांनी राजौरी सेक्टरला भेट देऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
"भारतीय लष्कर पूर्ण सतर्क असून एलओसीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे," असे लष्कराने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितले. शस्त्रसंधी करार अद्याप कायम असल्याचे स्पष्ट करताना, "काही किरकोळ संघर्ष झाले असले तरी मोठ्या प्रमाणावर गोळीबार झालेला नाही," असेही लष्कराने स्पष्ट केले.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दोन दिवसांत दोन उच्चस्तरीय सुरक्षा बैठका घेतल्या. या बैठकींमध्ये लष्कर, पोलीस, CRPF आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नियंत्रण रेषेवरील वाढत्या घुसखोरीच्या घटनांवर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

एलओसीवरील परिस्थितीवर सेना आणि प्रशासनाचे बारीक लक्ष
भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांनी जम्मू विभागात अतिरेकी घुसखोरी रोखण्यासाठी गस्त आणि ऑपरेशन अधिक तीव्र केली आहेत. एलओसीवरील परिस्थिती स्थिर असून लष्कर संपूर्ण तयारीत आहे, असे लष्कराने सांगितले.