जवळपास मागच्या दोन वर्षांपासून जातीय हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात असला तरी हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान प्रशासनाकडून आत्मसमर्पण आणि लुटलेली शस्त्रे परत करण्याचे आदेश व आवाहनाचा परिणाम दिसून येत आहे. राष्ट्रपती राजवटीच्या १४ दिवसांनंतर एक मोठे आत्मसमर्पण झाले आहे.
ज्या लोकांनी मुख्य प्रवाहात परतण्याचे आश्वासन दिले होते ते लोक मोठ्या प्रमाणात लुटलेली शस्त्रे घेऊन परतले आहेत.२ मार्चला चार जिल्ह्यांत ४२ शस्त्र आणि विविध गोळ्या पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आल्या आहे. बिश्नुपूर जिल्ह्यात स्थानिकांनी दोन पिस्तुले, सहा हॅण्ड ग्रेनेड आणि ७५ हून अधिक कार्ट्रिज पोलिसांकडे जमा करण्यात आल्या आहेत.
तामेंगलोंगमधील काइमाई पोलिस स्थानकात १७ देशी बनावटीचे शस्त्र, ९ 'पोम्पी' (स्थानिक बनावटीचे मोर्टार) आणि गोळ्या सुपुर्द करण्यात आल्या. इम्फाल वेस्ट आणि ईस्ट, चुराचांदपूर आणि लमसांग पोलिस स्थानकांतही १० हून अधिक शस्त्र आणि गोळ्या जमा झाल्या. तसेच मणिपूरच्या चार जिल्ह्यांमध्ये किमान २० बंडखोरांनी आत्मसमर्पण केले आहे.
२५ फेब्रुवारीला मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर आरामबाई टेंगोल या मेईतेई संघटनेच्या सदस्यांनी काल (दि.२) आपले शस्त्र ठेवले. सात दिवसांच्या कालावधीत प्रामुख्याने खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये जनतेने ३०० हून अधिक बंदुका जमा केल्या.
त्याठिकाणच्या डोंगराळ आणि खोऱ्यातील लोकांनी अतिरिक्त वेळेची मागणी केल्यानंतर त्यांनी लुटलेली आणि बेकायदेशीर शस्त्रे आत्मसमर्पण करण्याची अंतिम मुदत ६ मार्चला दुपारी ४ वाजेपर्यंत वाढवली. त्यानंतर राज्याच्या विविध भागात अधिक शस्त्रे जमा करण्यात आली.