राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव, वर्सोवामधून हारून खान आणि विलेपार्लेमधून संदीप नाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वर्सोव्यामध्ये ३४ % मुस्लिम मतदार असून हा मुस्लिम बहूल भाग ओळखला जातो. मिळालेल्या माहितीनुसार वर्सोव्याची जागा ही आधी कॉँग्रेस पक्षाला दिली गेली होती. परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपात वाटाघाटी करून उद्धव ठाकरे यांनी वर्सोव्याची जागा शिवसेनेकडे घेतली होती. आणि विशेष म्हणजे याच जागेवरून त्यांनी शिवसेनेचे मुस्लिम कार्यकर्ते हरून खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत हरून खान?
हरून खान गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी १९९५ मध्ये भाजपासोबत राजकीय प्रवासाला सुरुवात केली, हरून खान हे वर्सोव्यातील मोठा जनसंपर्क असलेले नेते आहेत.
भाजपला सोडल्यानंतर हरून खान यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते मोठ्या फरकाने विजयी झाले होते. वर्सोव्यात अनेक पायाभूत सुविधा केल्याचे रहिवासी सांगतात. याशिवाय मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. नगरसेवक म्हणून त्यांनी मतदारसंघात उत्कृष्ठ काम केल्याचे रहिवासी सांगतात.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात आघाडीला मोठे मताधिक्य मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी हरून खान यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. हरून यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात होता.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हरून म्हणाले होते, “आपल्या परिसराचा आणि मतदारसंघाचा विकास करायचा आहे. रखडलेल्या कामांना गती द्यायची असून त्यासाठी शिवसेना मला मदत करत आहे. म्हणून मी हा पक्षप्रवेश केला आहे.”
हरून खान यांनी नगरसेवक असताना प्रभागाचे सुशोभिकरण करण्याच्या उद्देशाने रस्ते, नाले, व्यायामशाळा, वाचनालये बांधली आहेत. तसेच संपूर्ण प्रभागात पथदिवे लावले आहेत. याशिवाय त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये १०० बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी तीन कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. त्यांच्या पत्नी शाहेदा खान यासुद्धा सक्रीय राजकारणात असून त्या या भागात नगरसेविका राहिल्या आहेत.
मुस्लिमांची नाराजी दूर करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न...
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाने मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिले नव्हते. मात्र तरी देखील मुस्लिम समाजाने महाविकास आघडीला भरभरून मतदान केले होते. यामुळे आघाडीचे राज्यातून ३१ खासदार निवडून आले.
यानंतर विधानपरिषद निवडणुका होणार होत्या. त्यामध्ये तरी महाविकास आघाडी मुस्लिमांना प्रतिनिधित्व देईन असे मुस्लिम समाजाला वाटले होते. परंतु त्याठिकाणी देखील आघाडीने मुस्लिम उमेदवार दिला नाही. यामुळे महाविकास आघाडीवर विशेषतः उद्धव ठाकरेंवर मुस्लिम समाज नाराज झाला होता. त्यावेळी आघाडी आणि ठाकरे यांच्या विरोधात मुस्लिम समाजातील एका गटाने मोठी निदर्शने देखील केली होती.
आता येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वर्सोव्यातून हरून खान यांना उमेदवारी देत मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतो. वर्सोवा मतदारसंघात गेल्या दोन टर्ममध्ये भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी वेगळी खेळी खेळली आहे.अजूनही शिवसेनेकडून काही उमेदवार जाहीर होणार आहेत. त्यामध्ये देखील ठाकरे आणखी मुस्लिम उमेदवार देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.