नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, मुख्य सचिव, तसेच जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमित शहा या बैठकीस संबोधित करताना म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे. मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादविरोधी परिसंस्था मोठ्या प्रमाणात कमजोर झाल्या आहेत.”
गृहमंत्र्यांनी सुरक्षा एजन्सींना ‘नो इंफिल्ट्रेशन' ध्येय साध्य करण्यासाठी दहशतवादाविरुद्धची लढाई आणखी तीव्र करण्याचे निर्देश या बैठकीतून दिले. ते म्हणाले, “घुसखोरी, दहशतवादी कारवाईवर कठोर कारवाई करा. दहशतवाद्यांचे अस्तित्व उखडून टाकणे हे आपले ध्येय आहे.”
अमित शहा यांनी यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला. यामध्ये त्यांनी नार्को नेटवर्क दहशतवाद्यांना आणि घुसखोरांना कारवायांसाठी सहाय्य करत आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारातून मिळणाऱ्या पैशांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरक्षा विभागांना नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील (FSL) विविध पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अमित शहा यांनी 'नो टॉलरेंस' या धोरणावर भर दिला आहे. या धोरणाचा सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "सर्व सुरक्षा एजन्सींनी एकत्र येऊन जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सहकार्याने कार्य करणे आवश्यक आहे. सुरक्षा यंत्रणांनी गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी काम केले. या कामाचे कौतुक देश करत आहे.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या सूचनांच्या आणि सरकारच्या कठोर धोरणांमुळे आगामी काळात जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. दहशतवाद आणि घुसखोरीविरोधी लढाई अधिक सक्षम करण्यासाठी सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करत असल्याचे शाह म्हणाले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter