पहिल्या अधिवेशनाची तयारी करणाऱ्या सना मलिकांना वडलांचे मार्गदर्शन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना सना मालिक
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना सना मालिक

 

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरु आहे. नवनिर्वाचित आमदारांचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी अनेक नवीन आमदार पहिल्यांदाच अधिवेशनात सहभागी होणार आहेत, प्रश्न विचारणार आहेत. यावेळी १० मुस्लीम आमदारही सभागृहाचे सदस्य असणार आहेत. त्यापैकीच एक आहे अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडून आलेली सना मलिक. त्या पहिल्यांदाच विधानसभेच्या सदस्य झाल्या आहेत.  

आपली लेक सना मलिक आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत बोलणार आहे, त्यामुळे ती बोलताना तिची सभागृहात वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे यासाठी लेकीला सभागृहात काय आणि कसे बोलावे यासाठीचे धडे देण्यासाठी माजी मंत्री व आमदार सना मलिक यांचे वडिल नवाब मलिक आज नागपूर विधानमंडळात धावून आले.

विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच मलिक यांनी विधानमंडळाच्या परिसरात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आपल्या लेकीला विधानमंडळातील कामकाज, त्यासाठीचे विषय आणि कसे बोलावे याचे धडे दिले. तर लेकीनेही आपल्या वडलांकडून अनेक गोष्टी ऐकून घेतल्या.
 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजपत्रिकेत सना मलिक या नियम २९३ अन्वये राज्यातील तात्कालिक विषयांवर सत्ताधारी आणि विरोधीपक्ष सदस्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावावर बोलणार आहेत. त्यांचे नाव या प्रस्तावात अग्रक्रमाने आहे. त्या सभागृहात बोलणार असल्याने मुंबईसह राज्यातील अनेक विषयांवर कसे बोलायचे, कोणते मुद्दे प्रभावीपणे मांडायचे यासाठीचे आपले अनुभव आणि धडेही त्यांना आपल्या वडलांकडून आज नागपूर विधानमंडळ परिसरात मिळाले.

पहिल्याच अधिवेशनातील अनुभवांविषयी बोलताना सना मलिक म्हणाल्या, "सुरुवातीला मी थोडी गडबडून गेले होते. मात्र आता अधिवेशनाचा दुसरा दिवस अनुभवल्यावर माझ्याकडे बऱ्यापैकी आत्मविश्वास आलाय. अधिवेशनात मी माझ्या मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण, आरोग्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांविषयी प्रश्न विचारणार आहे. हे मुद्दे माझ्या प्राधान्यक्रमावर असणार आहेत."

मुंबई उपनगरातील अणुशक्ती नगर या मतदार संघातून सना मलिक या निवडून आल्या आहेत. वडलांप्रमाणेच लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेण्याची त्यांची तळमळ त्यांना आपल्या वडलांच्या वारशापासून मिळाली आहे. वडिल संकटात असताना आपल्या मतदारसंघातील नागरीकांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांसाठी कायम सजग असलेल्या सना मलिक यांना स्थानिक मतदारांनीही भरभरून मते देत विधानसभेत पाठवले. त्यामुळेच विधानमंडळात आपली छाप निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या वडलांकडून मोलाचे मार्गदर्शन घेतले आहे. या माध्यमातून माध्यमातून सभागृहात एकप्रकारे नवाब मलिक यांची एक उण‍िवही त्या भरून काढतील असे जाणकारांचे मत आहे.

अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघात सना मलिक यांची लाडकी लेक म्हणूनही ओळख आहे. त्या महिलांमध्ये प्रचंड आपुलीचा विषय बनल्या आहेत. निवडून आल्यापासून त्या मतदारसंघातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. नुकतीच दत्त जयंतीनिमित्त त्यांनी मतदारसंघातील दत्त मंदिरांना भेट दिली आणि महाप्रसादाचाही लाभ घेतला. याची माहिती खुद्द सना मलिक यांनीच सोशल मिडीयावरून दिली. निवडणुकीदरम्यान असंख्य महिलांनी त्यांना आपली लेक म्हणून त्यांना निवडून येण्यासाठी आशीर्वाद दिले होते, त्यांची ही लेक आता विधानसभेत बोलणार असल्याने मतदार संघातील अनेकांचे लक्षही याकडे लागले आहे.

 

अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये असलेल्या सना मलिक यांनी नागपूरची प्रसिद्ध  ताजुद्दीन बाबा दर्गाहलाही आपल्या वडिलांसह भेट दिली आणि आशीर्वाद घेतले. तत्पूर्वी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांनी आयोजित केलेल्या 'महिला मंत्री आणि लोकप्रतिनिधी स्वागत सोहळ्यात' सना मलिक यांचा सत्कारही करण्यात आला. 'या सन्मानाने मला प्रेरणा मिळाली असून अशा सोहळ्यांमुळे महिला नेतृत्वाला नवा सन्मान आणि प्रोत्साहन मिळत आहे, याचा आनंद आहे.' अशी प्रतिक्रिया सना मलिक यांनी सत्कारानंतर दिली.

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter