शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांची दोन पावलं माघार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 19 d ago
शंभू बॉर्डरवर आंदोलन करणारी शेतकरी
शंभू बॉर्डरवर आंदोलन करणारी शेतकरी

 

शंभू बॉर्डवर साधारण आठ महिन्यांपासून धरणं देणाऱ्या शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीकडे निघालेले शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना शंभू बॉर्डवरच रोखण्यात आलं. त्यामुळे हरियाणा पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.

शेतकऱ्यांनी सुरक्षेचं कठडं तोडत बॅरिकेट्सची मोडतोड केली. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना मागे रेटण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी एका शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. अंबाला येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे.

दिल्ली मार्च सुरु झाल्यानंतर तीन तासांनी शेतकरी शंभू बॉर्डवरुन मागे हटले. शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांशी झटापट झाल्याने अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. ज्यात दोघांना गंभीर जखम झाली आहे. शेतकऱ्यांवर बळाचा वापर केल्याने त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

शेतकरी नेते पंढेर काय म्हणाले?
शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर म्हणाले की, शाळा बंद व्हाव्यात, इंटरनेट बंद व्हावं अशी आमची इच्छा नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. बैठकीसाठी केंद्रीय कृषीमंत्री असाववे, अशी आमची मागणी आहे. सरकारला उद्याचा वेळ देत आहोत. नाहीतर रविवारी आम्ही दिल्लीकडे कूच करु.

पंढेर पुढे म्हणाले की, पोलिसांसोबत झालेल्या हिंसेमध्ये आठ लोक जखमी झालेले आहेत आणि दोघे गंभीर जखमी आहेत. सरकारने आम्हाला रोखण्यासाठी बळाचा वापर केला आहे. आमच्याकडे कुठलीही हत्यारं नव्हती. आम्ही शिस्तीत १०१ लोकांनी आमचं शिष्टमंडळ पाठवलं आहे.