दिल्लीच्या सीमेवरच ठाण मांडण्याचा शेतकऱ्यांचा ईशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नवीन भूसंपादन कायद्यातील सर्व लाभ दिले जावेत, विकसित जमिनीमध्ये दहा टक्क्यांची हिस्सेदारी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर नोएडा येथे आज आंदोलन केले. दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले तर सीमेवर ठाण मांडण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला होता. प्रशासनाच्या विनंतीनंतर शेतकरी महामार्गावरून हटले. त्यानंतर त्यांनी दलित प्रेरणा स्थळावर आंदोलनास सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी सीमेवर जमल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी दिल्लीत प्रवेश करू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड लावण्यात आले होते. यातील काही बॅरिकेड शेतकऱ्यांनी उलथवून टाकले. पोलिस आणि प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर दलित प्रेरणा स्थळावर जाण्यास शेतकरी तयार झाले. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरू राहील, असे भारतीय किसान युनियनचे नेते बी. सी. प्रधान यांनी सांगितले.

आंदोलनामुळे वाहतूक कोंडी 
शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरल्यामुळे दिल्ली ते नोएडा दरम्यानच्या मार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. महामाया पुलाजवळ पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखून धरले होते. यामुळे हजारो लोक रस्त्यातच अडकले. चिल्ला सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. आंदोलनामुळे नोएडा शहरातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली
होती.

शेतकरी नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
"आंदोलनादरम्यान रस्ते अडवू नका तसेच लोकांची गैरसोय करू नका," असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शेतकरी नेत्यांना दिले आहेत. लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल हे त्यांच्या सहकाऱ्यांना शांततामय मार्गाने आंदोलन करण्यास सांगू शकतात, अशी सूचना न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने केली.

डल्लेवाल यांना पोलिसांनी सोडले आहे. त्यांच्या एका सहकाऱ्याने शनिवारी उपोषण देखील थांबवले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची न्यायालयाने दखल घेतली आहे. गेल्या आठवड्यात डल्लेवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी पंजाब-हरियाना दरम्यानच्या खनौरी सीमेवरून हटविले होते. खनौरी सीमा ही पंजाबची जीवनरेषा आहे. त्या ठिकाणी केले जाणारे आंदोलना योग्य आहे की अयोग्य, हे आम्ही सांगू शकत नाही, असा शेरा न्यायालयाने मारला. डल्लेवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेची तूर्तास दखल घेतली जाणार नाही. मात्र ते नंतर संपर्क साधू शकतात, असे न्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबरला खनौरी सीमेवर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशार दिला होता. मात्र उपोषणास सुरुवात होण्याच्या काही तासांपूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत लुधियानात दाखल केले होते.