देशभरातील शेतक-यांनी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन पुन्हा सुरु केले आहे. या आंदोलनाचा भाग शेतकरी संघटना म्हणून आज १६ डिसेंबर रोजी पंजाब व्यतिरिक्त इतर राज्यांत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. याशिवाय 18 डिसेंबर रोजी पंजाबमध्ये 'रेल रोको' आंदोलन करण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. पंजाबचे शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंजाबमधील रेल रोको आंदोलनासाठी त्यांनी १३ हजार गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना दुपारी १२ वाजता रेल्वे ट्रॅक रोखण्यासाठी आवाहन करण्यात केले आहे.
पटियाला येथील शंभू बॉर्डर येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पंजाबमधील रेल्वे क्रॉसिंगजवळ राहणाऱ्या सर्व लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. त्यांनी या आंदोलनाचा एक भाग व्हावे, असे आमचे आवाहन आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या दोन्ही मंचांनी हा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी पायी जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हरियाणाच्या सुरक्षा जवानांच्या कारवाईत १७ शेतकरी जखमी झाले.
राकेश टिकैत यांना रेल रोको आंदोलनासाठी पत्र
शेतकरी नेते सर्वन सिंह यांनी रेल रोको आंदोलनासाठी संयुक्त किसान मोर्चाला पत्र लिहिले. संयुक्त किसान मोर्चा ज्याचे नेतृत्व राकेश टिकैत यांनी शेवटच्या शेतकरी आंदोलनात केले होते. त्यांनी पत्रात कामगारांच्या हिताची चर्चा केली. शेतकरी, मजुरांच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या लढ्याला साथ देऊया, असे ते म्हणाले. पायी कूच करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता शेतकऱ्यांनी पंजाबचे रेल्वे रुळ उखडण्याची योजना आखली आहे. शेतकऱ्यांच्या या योजनेमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असल्याने त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास उशीर होऊ शकतो.
तीनदा दिल्लीत धडकण्याचा प्रयत्न
या महिन्यांत शेतकऱ्यांनी तीन वेळा राजधानीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस प्रशासनाने त्यांना तेथे जाऊ दिले नाही. ६, ८ आणि १४ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला होता. १४ डिसेंबर रोजी त्यांच्यावर अश्रुधुराचे गोळीबार करण्यात आला, त्यात १७ शेतकरी जखमी झाले. या सर्व प्रकारानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन आणखी मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
पंढेर पत्रकार परिषदेत म्हणाले की, "जगातील ५व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारत सरकारने १०१ शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला. तोफांचा वापर करून आमच्यावर रासायनिक पाणी फेकले, बॉम्ब फेकले आणि अश्रूधुराचे गोळे फेकले. १७ शेतकरी जखमी झाले. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.रुग्णालयांमध्ये योग्य उपचार दिले जात नाहीत, आम्ही पंजाब सरकारला पुरेसे उपचार सुनिश्चित करण्याची विनंती करतो. शिवाय, संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची प्रभावीपणे दखल न घेतल्याबद्दल पंढेर यांनी विरोधकांवर टीका केली. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.