माजी सैनिक राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत - लष्करप्रमुख द्विवेदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 4 h ago
सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी
सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी

 

"तुम्ही सर्व जण केवळ देशाचे शूर रक्षक नाही, तर आजही आपल्या समाजासाठी आणि राष्ट्रासाठी प्रेरणास्त्रोत आहात. सैन्यातील तुमच्या योगदानापासून ते निवृत्तीनंतरच्या तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्यांपर्यंत तुमचा प्रवास आपल्या राष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे," असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले.

पुण्यातील ४१ तोफखाना विभाग मुख्यालय येथे नववा सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे (निवृत्त), जनरल मनोज पांडे (निवृत्त), जनरल व्ही. पी. मलिक (निवृत्त) आदी उपस्थित होते.

जनरल द्विवेदी म्हणाले, "आज आपले राष्ट्र 'विकसित भारत' ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची समावेशकता आवश्यक आहे. अशा वेळी आपले माजी सैनिक राष्ट्रीय प्रयत्नांना सक्षम आणि बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांचा वापर करता येईल, अशा क्षेत्रांची श्रेणी वाढवली जात आहे. या प्रयत्नाचे दोन पैलू आहेत, जे समांतरपणे पुढे नेण्याची आवश्यकता आहे. पहिले म्हणजे राज्य सरकारला त्यांच्या कामकाजात माजी सैनिकांचा समावेश कसा करता येईल? त्यांचा फायदा कसा होऊ शकतो? दुसरे म्हणजे माजी सैनिक आणि राज्य सरकार दोघांसाठीही मान्यता आणि योगदानाचा पूरक संबंध प्रस्थापित करणे."

या कार्यक्रमामध्ये नऊ सैनिकांना मरणोत्तर सेना पदक देऊन गौरविण्यात आले. या सैनिकांच्या वीर माता-पिता, वीरांगना यांनी सन्मान स्वीकारला. दरम्यान, जनरल द्विवेदी यांनी 'सन्मान' मासिकाच्या १० व्या आवृत्तीचे अनावरण केले.

कृत्रिम अवयव केंद्राला लष्कप्रमु‌खांची भेट
लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी पुण्यातीत कृत्रिम अवयव केंद्राला भेट दिली. त्यांनी केंद्राच्या अत्याधुनिक सुविधांचा आढावा घेतला. नव्याने बांधलेल्या 'अप्पर लिंब ट्रेनिंग लॅब'चे द्विवेदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारतीय सैनिकांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी हे केंद्र अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी सैनिकांसाठी महत्त्वाची कामे पूर्ण
■ कल्याणकारी योजनांमार्फत १२,००० लाभार्थ्यांना ५८ कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित
■ कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे २८,००० हून अधिक माजी सैनिकांना दुसऱ्या करिबरसाठी तयार केले
■ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत ५,३९९ सेवारत आणि माजी सैनिकांच्या कुटुंबांना आधुनिक नोकऱ्यांसाठी सक्षम केले
■ आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनद्वारे ४५० अधिकारी, १६,०४३ 'जेसीओ' आणि 'ओआर' आणि ३०६ माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार मिळाला
■ माजी सैनिक समुदायाकरिता रोजगार सुनिश्चित करण्यासाठी १२ नवीन सामंजस्य करार व १० नवीन सार्वजनिक उपक्रमांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
■ प्रोजेक्ट नमनअंतर्गत १४ केंद्रे स्थापन केली. वर्षाअखेरीस एकूण २०० नमन केंद्रे स्थापन
■ व्हीएसके (वेटरन्स आणि वीरांगना सेवा केंद्र) अद्ययावत केले असून, माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या अवलवितांसाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध
■ वन रैंक वन पेन्शन २०२४ अंतर्गत पेन्शनच्या समस्या सोडवल्या
■ 'ईसीएचएस'ची पोहोच मजबूत करण्यासाठी एक नोव्हेंबर २०२४ रोजी संरक्षण मंत्रालयाने २३ नवीन पालिक्लिनिकचे बांधकाम, ५० पॉलिक्लिनिकचे अपग्रेडेशन आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यास मान्यता

लष्कर दिनानिमित्त संरक्षणमंत्री आज पुण्यात
समृद्ध इतिहासाचा वारसा असलेल्या पुण्यात लष्कराच्या स्थापना दिनानिमित्त दक्षिण मुख्यालयातर्फे 'आर्मी डे परेड' बुधवारी (ता. १५) पुण्यात होत आहे. या निमित्ताने सायंकाळी पाच वाजता 'गौरवगाथा' विशेष कार्यक्रम होणार असून, यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.

लष्करी वारशासाठी ओळखले जाणाऱ्या पुण्याचे संरक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. खडकीतील बॉम्बे सॅपर्स (बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटर) येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये लष्कराच्या संचलनाचे खास आकर्षण आहे. यावेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

२०२३मध्ये 'आर्मी डे परेड' बंगळूरमध्ये झाली. हा कार्यक्रम राजधानीबाहेर पहिल्यांदाच आयोजित केला होता. २०२४मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये परेड झाली. त्यानंतर आता २०२५मध्ये पुण्यात परेड होणार आहे.