'राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा निवड झाली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, आता त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावे', अशा शब्दात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. आता फडणवीस यांनी फक्त लाडक्या बहिणींसाठी नाही, तर लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके बेरोजगार या सगळ्यांसाठी काम करावे, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला. विधानसभेच्या औरंगाबाद पुर्व मतदार संघातून इम्तियाज जलील यांचा अवघ्या २१०० मतांनी पराभव झाला होता.
भाजपचे उमेदवार मंत्री अतुल सावे यांच्याकडून निवडणूक काळात पैसे वाटप झाल्याचा आरोप करत त्याचे पुरावे इम्तियाज जलील यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवले होते. तसेच जिल्हाधिकारी, निवडणुक निर्णय अधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात सावे यांनी पैसे वाटल्याचे सिद्ध होत नसल्याचे म्हटले. यावर इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
"आयुष्यात मी पाहिलेली ही सर्वांत भ्रष्ट निवडणूक होती. एमआयएम दोन वेळा हरलेल्या पूर्व मतदारसंघात विद्यमान सत्तेतील मंत्र्यांचे आव्हान होते. ते स्वीकारून मी लढलो. ते जिंकले अन् मी हरलो असलो तरी एमआयएमने बरोबरीने मते घेतली. या सर्व डावपेचात खऱ्या अर्थाने मी हरून जिंकलो. त्यांनी पैसे खर्च न करता निवडणूक लढवली असती तर आज मी विधानसभेत आणि ते घरी बसले असते! पण, राजकारणात ‘जर- तर’ला किंमत नसते. त्यामुळे खिलाडूवृत्ती ठेवून आम्ही पुढे जात आहोत," असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नमूद केले.
जलील म्हणाले...
यावेळी जलील म्हणाले, "भाजपाने जिंकण्यासाठी जे काही चुकीचे प्रयोग करायचे त्यांनी केले. माझ्या विरोधात त्यांनी १३ मुस्लिम उमेदवार दिले. महिलांना प्रगतीसाठी मदत द्या, परंतु दीड हजारात मते विकत घेऊ नका. लोकांना ईव्हीएम नको आहे. या यंत्रावर संशय आहे, तर नरेंद्र मोदी यंत्रणेत बदल का करीत नाहीत? यात मोठ्या पक्षांनी जनआंदोलन करावे, आम्ही सोबत राहू."
एमआयएम सर्वसमावेशक होतोय
एमआयएमने इमेज बदलली आणि तो सर्वसमावेशक होतोय म्हणून म्हणून अकबरुद्दीन ओवेसी यांची जुनी क्लिप वारंवार दाखवून ध्रुवीकरण केले जात आहे. त्यांच्या वक्तव्याचे मीसुद्धा समर्थन करत नाही. मात्र, त्यासाठी त्यांनी चार महिने कारावास भोगला आहे. आज त्यांच्यापेक्षाही अधिक प्रक्षोभक भाषणे करून तेढ निर्माण केली जात आहेत. त्यांच्यावर कधीही कुठलीही कारवाई होत नाही. हा दुजाभाव का, असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
आमच्या मुस्लिमेतर मतदारांवरील दबाव आम्ही अनुभवला
मराठी वसाहतीत कुणाच्याही घरी गेल्यावर त्या लोकांवर दबाव यायचा. त्यांच्या घरासमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जायच्या. ‘हिरव्या सापा’ला कशाला बोलावता अशी दमबाजी व्हायची. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यावर तिथे शुद्धीकरण केले जायचे. मी आणि माझा मुलगा बिलाल, आम्ही हे अनुभवले. त्यांनी एवढे करूनही एकही मुस्लिम मतदार नसलेल्या वसाहतीतून एमआयएमला १५ हजार मते मिळाली.
एमआयएम दलितविरोधी नाही
एमआयएम दलितविरोधी असल्याचा खोटा समज पसरवला जातोय.मात्र आम्ही दलितविरोधी असतो तर राज्यात सोळापैकी चार जागांवर दलितांना उमेदवारी दिली असती का, असा सवालही इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. नव्या सरकारने बेरोजगार तरुणांच्या हाताला काम, शेतकऱ्याच्या मलाला भाव द्यावा, एवढीच अपेक्षा असल्याचे इम्तियाज जलील शेवटी म्हणाले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter