India@76 : यामुळे नव्वदीचे दशक ठरले प्रचंड राजकीय आणि सामाजिक उलथापालथींचे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांच्या वाटचालीचा विविधांगी आढावा घेणारे लेखन 'आवाज मराठी'वर या आठवडाभर प्रसिद्ध होणार आहे. त्यापैकी, नव्वदीच्या दशकांत घडलेल्या घटनांचा लेखाजोखा मांडणारा हा विशेष लेख...

 

भारतीय राजकारणावर ठसा उमटवणारे १९९१ ते २००० हे दशक म्हणता येईल. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांतील घडामोडींनी हे दशक अक्षरशः गजबजून गेले. तसेच, या दशकातील घडलेल्या घडामोडींमुळे त्याचे दूरगामी परिणाम देशावर झाले. त्यामुळेच २०व्या शतकाचा इतिहास लिहिताना या दशकाची आवर्जून नोंद घ्यावी लागेल. या काळात सीमेवरही भारताला पाकिस्तानबरोबर कधी उघड, तर कधी छुपा संघर्ष करावा लागला. त्यामुळे देशासमोर अनेकदा आव्हान निर्माण झाले होते. मात्र, देशातील व्यवस्थेने ते लिलया पेलले.

 

आर्थिक उदारीकरण, अयोध्येतील बाबरी मशीद पाडली जाणे, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, पुढे किल्लारीतील भूकंप, अस्थिरतेच्या सावटामुळे झालेल्या तीन लोकसभा निवडणुका, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उदय, अणुचाचण्या, कारगिल युद्ध अशा कितीतरी घटना या दशकात घडल्या. या घटनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रभाव अथवा परिणाम एका विशिष्ट भागावर झाला नाही तर, संपूर्ण देशावर झाला. हर्षद मेहतासारख्या शेअर दलालाच्या गैरकृत्यांमुळे अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला आणि सुमारे ४ हजार कोटीं रुपयांहून अधिक मोठा गैरव्यवहार उघड झाला. या प्रकरणामुळे बॅंकिंग व्यवस्थेतील त्रुटी दिसून आल्या. पुढे केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन उपाययोजना केल्या आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याचा काळात आर्थिक उदारीकरणाला सुरवात झाली. खासगी क्षेत्राला त्यात झुकते माप देण्यात आले. त्यामुळे कामगार संघटनांनी आक्रोश केला. परंतु, जागतिक दबावापोटी सुरू झालेल्या सुधारणांचा वेग देशाला कमी करता आला नाही.


याच दरम्यान काही घटनांमुळे धार्मिक हिंसाचार उफाळला. परिणामी देशाचा सामाजिक स्तर विस्कटला. दैनंदिन गरजेच्या गोष्टींपेक्षा भावनाशील मुद्द्यांवर भर देण्यात आला. परिणामी सामाजिकबरोबरच राजकीय ध्रुवीकरणही झाले. या घटनांचा राजकीय पक्षांवरही परिणाम झाला. देशात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाला याच कालावधीत काहीशी उतरती कळा लागली अन् भाजपला बळ मिळू लागले. याच दरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांची तीव्रता वाढली. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार, तारिक अन्वर, पीए संगमा काँग्रेसमधून बाहेर पडले आणि १० जून १९९९ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याच्या राजकारणात बस्तान बसविले अन काँग्रेसला त्याचा फटका बसला.


आर्थिक सुधारणांना सुरुवात

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी १९९१च्या सुमारास आर्थिक सुधारणांना प्रारंभ केला. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रांत पहिल्यांदाच खासगी गुंतवणूकदारांना संधी मिळाली. तसेच, देशातील उद्योगांत परदेशातील उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास सुरवात केली. त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. केंद्र सरकारच्या या सुधारणांना अनेक कामगार संघटनांनी विरोध केला होता. परंतु, उद्योगांना मुक्तद्वार मिळावे, अशी जगभर धारणा निर्माण झाली होती. त्यातूनच ‘गॅट’ कराराचे आगमन झाले. या करारावर तब्बल १२४ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तरीही सुरवातीला भारत सुरवातीला या करारापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, जागतिक दबावामुळे भारताला या करारावर स्वाक्षरी करावीच लागली. त्यातूनच जागतिक व्यापार संघटना या व्यापारातून परदेशी गुंतवणुकीबरोबरच तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे आली. याचा मोठा फायदा दूरसंचार क्षेत्राला झाला. त्यातूनच इंटरनेटचा प्रसार आणि प्रचार वेगाने झाला. संगणक, लॅपटॉप, मोबाईल आदी साधने मुबलक स्वरूपात उपलब्ध झाली.


काँग्रेसवर आघात

लोकसभा निडणुकीसाठी प्रचार सुरू असताना, तमिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे २१ मे १९९१ रोजी मानवी बॉम्बद्वारे स्फोट घडवून राजीव गांधी यांच्या हत्या करण्यात आली. आधी इंदिरा गांधी व नंतर राजीव गांधी यांची हत्या झाल्यामुळे कॉंग्रेसवर दूरगामी आघात झाला. पक्षामध्ये नेतृत्त्वाची पोकळी झाली. गांधी यांनी देशाला नवी दिशा दाखविली होती. मात्र, त्यांचा अकाली अंत झाल्यामुळे कॉंग्रेसवर निराशेचे सावट पसरले होते.


अयोध्या आणि बॉम्बस्फोट!

राम मंदिरासाठी देशात १९९०च्या मोठे आंदोलन उभे राहिले होते. विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांचा त्यात विशेषतः पुढाकार होता. त्यासाठीच भाजपचे तत्कालीन नेते लालकृष्ण अडवानी यांनी गुजरातमधून सोमनाथ येथून २५ सप्टेंबर १९९० रोजी रथयात्रा सुरू केली. ३० ऑक्टोबरला अयोध्येत पोचण्याचे त्यांचे नियोजन होते. दररोज ३०० किलोमीटरचा पल्ला गाठण्याचे त्यांचे नियोजन होते. रथयात्रा बिहारमध्ये पोचली. तेथून उत्तर प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना अडवानी यांना अटक करण्याचा आदेश दिला. अडवानींच्या अटकेनंतर देशात अनेक ठिकाणी भाजपने आंदोलने केली. त्यानंतर दोन वर्षांतच विश्व हिंदू परिषद, भाजप आणि संघ परिवाराने अयोध्येत कारसेवा आयोजित केली. त्यामुळे ६ डिसेंबर १९९२ रोजी लाखो कारसेवक अयोध्येत गोळा झाले. त्या दिवशी सकाळी कारसेवकांच्या एका गटाने वादग्रस्त वास्तूत प्रवेश करून तेथील बाबरी मशीद जमीनदोस्त केली. या घटनेने जगभर खळबळ उडाली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी राजीनामा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केली. बाबरी मशीद खटल्यात लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, अशा अनेक नेत्यांची नावे होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. मात्र, दोन वर्षांपूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.


अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर चार महिन्यांतच मुंबई दहशतवाद्यांनी भीषण बॉम्बस्फोट घडवून आणले. १२ मार्च १९९९३ रोजी अवघ्या दीड तासांतच मुंबईत शेअर बाजार, एअर इंडियाची इमारत, झवेरी बाजार, शिवसेना भवन, सहार विमानतळ, जुहू सेंटॉर हॉटेल आदी वर्दळीच्या १२ ठिकाणी स्फोट घडवून आणले. या घटनेत सुमारे २५७ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला तर, १४००हून अधिक नागरिक जखमी झाले. त्याशिवाय कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली ती वेगळीच. मुंबईतील नागरिकांना या घटनेचा मानसिक धक्काही बसला. मात्र, अल्पावधीतच मुंबई या घटनेतून सावरली. जगातील प्रमुख दहशतवादी घटनांमध्ये मुंबईतील १२ बॉम्ब स्फोटांचा समावेश झाला. या स्फोटातील एक दोषी याकूब मेननला २०१५ मध्ये नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. मात्र, या स्फोटाचा मुख्य सूत्रधार व गुंड दाऊद इब्राहीम आणि टायगर मेनन अद्याप फरारी आहेत. बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी दाऊदने हे बॉम्बस्फोट पाकिस्तानच्या साह्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे सांगितले जाते. बाबरी मशीद पाडली जाणे आणि मुंबईतील बॉम्बस्फोट, या दोन्ही घटना जगभर गाजल्या. त्याचे दूरगामी परिणाम देशावर झाले. तसेच या शतकातील महत्त्वाच्या घटनांत त्यांचा समावेश झाला.


राजकीय अस्थिरता

या दशकात देशाने एकूण चार पंतप्रधान पाहिले. सुरुवातीला पी. व्ही. नरसिंह त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी, एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांचा त्यात समावेश होता. वाजपेयी यांना तीनवेळा पंतप्रधानपद भूषणविण्याची संधी मिळाली. या काळात प्रादेशिक पक्ष बलवान झाले होते, तसेच केंद्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नव्हते. त्यामुळे आघाड्यांच्या राजकारणाचा हा काळ होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. १९९६ ते १९९९ दरम्यान लोकसभेच्या तीन निवडणुका झाल्या.


तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील नव्या लोकसभेची मुदत एप्रिलमध्ये संपली. त्यामुळे अकराव्या लोकसभेसाठी २७ एप्रिल १९९६ रोजी मतदान झाले. हे मतदान तीन टप्प्यांत म्हणजेच २७ एप्रिल, २ आणि ७ मे रोजी झाले. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सत्ताधारी काँग्रेसचा पराभव झाला. भाजपला सर्वाधिक म्हणजे १६१ जागा मिळाल्या. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. परंतु, संसदेमध्ये त्यांना बहुमत स्पष्ट न करता आल्यामुळे १३ दिवसांतच राजीनामा द्यावा लागला. संयुक्त आघाडीने या वातावरणामध्ये जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते २१ एप्रिल १९९७ पर्यंत पंतप्रधानपदावर होते. त्यानंतर संयुक्त आघाडीने इंद्रकुमार गुजराल यांना पाठिंबा दिला त्यामुळे ते पंतप्रधान झाले. परंतु काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांनी गुजराल सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. परिणामी हे सरकार पडले. त्यातून मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या. १२व्या लोकसभेसाठी १६ फेब्रुवारी १९९८ रोजी तीन टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजे १८१ जागा मिळाल्या.


तेलुगू देसम आणि ‘एआयएडीएमके’ने पाठिंबा दिल्यामुळे भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. मात्र, हे सरकार अवघे तेरा महिनेच टिकले, कारण १७ एप्रिल १९९९ रोजी ‘एआयएडीएमके’ने पाठिंबा काढून घेतल्यामुळे लोकसभेत वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा पाच १९९९ रोजी लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजप आणि मित्र पक्षांची संयुक्त लोकशाही आघाडी (एनडीए) स्थापन झाली. या निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आणि देशातले पहिले बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आले. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची पुन्हा शपथ घेतली. या सरकारने मात्र आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे २००४ पर्यंत वाजपेयी पंतप्रधान पदावर होते.


पोखरण अणुचाचण्या

याच दशकात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ११ मे १९९८ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे भारताने पाच अणुचाचण्या घेतल्या. त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्ताननेही २८ मे १९९८ रोजी सहा अणुचाचण्या घेतल्या. अणुबॉम्बसंपन्न दोन देशांमधील स्पर्धा पाहता, काही काळ जगात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यानंतर दोनच वर्षांत पाकिस्तानने कारगीलमध्ये घुसखोरी केली. भारताने चोख प्रत्युत्तर देत ६ मे २००० रोजी सुरू झालेल्या युद्धाचे रूपांतर १७ जुलैला विजयात केले. यामुळे भारताचे वाढलेले लष्करी सामर्थ्य अधोरेखित झाले.


घटनाक्रम

१९९१ : तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली देशात आर्थिक सुधारणांचे पर्व सुरू. सार्वजनिक क्षेत्रांत खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीस प्रारंभ.

 

२१ मे १९९१ : भारताचे तरुण, उमदे नेतृत्व असणाऱ्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तमिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे निवडणूक प्रचार सभेसाठी ते जात असताना आत्मघातकी बॉम्बस्फोटाद्वारे त्यांची हत्या करण्यात आली. हा बॉम्बस्फोट इतका शक्तिशाली होता, की राजीव गांधी यांचा चेहरा छिन्नविच्छिन अवस्थेत सापडला होता. या हत्येमागे श्रीलंकन तमीळ फुटीरतावादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम (एलटीटीई) चा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. गांधी यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यांच्यानंतर काँग्रेसची सूत्रे हाती घेतलेल्या राजीव गांधी यांचीही अकाली हत्या झाल्याने जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेचे भारतीय राजकारणावरही दूरगामी पडसाद उमटले.


३० मार्च १९९२ : प्रसिद्ध सिनेजगतातील ऋषितुल्य व्यक्ती सत्यजित राय यांना ऑस्करचा जीवनगौरव पुरस्कार.


२३ एप्रिल १९९२ : शेअर दलाल हर्षद मेहताचा सहभाग असलेला रोखे गैरव्यवहार टप्प्याटप्प्याने उघडकीस. सुमारे ४ हजार कोटींचा या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा अंदाज आहे. अनेक बँकांना त्याचा फटका बसला. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाने या बाबत बऱ्याच उपाययोजना केल्या. मेहतावर देशात अनेक ठिकाणी खटले झाले. त्यानंतर तो तुरुंगात असताना ३१ डिसेंबर २००१ त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.


२३ एप्रिल १९९२ : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे (वय ७१) यांचे २३ एप्रिल १९९२ रोजी प्रदीर्घ आजाराने कोलकत्ता निधन झाले. भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आले होते. रे यांना विसाव्या शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक मानले जाते. भारताच्या मातीतील चित्रपट त्यांनी आपल्या परीसस्पर्शानं साऱ्या जगात पोहचवला होता. त्यांच्या चित्रपटांना जगातील अनेक मानाच्या चित्रपट महोत्सवात गौरविण्यात आले होते.


६ डिसेंबर १९९२ : तत्कालीन राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेली अयोध्येतील वादग्रस्त वास्तू असलेली बाबरी मशीद कारसेवकांनी जमीनदोस्त केली. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी तातडीने राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. बाबरी मशीद खटल्यात लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती अशा अनेक बड्या नेत्यांची नावे होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या घटनेचे देशावर दूरगामी परिणाम झाले.


१२ मार्च १९९३ : मुंबईत दहशवाद्यांनी अवघ्या दीड तासांत वेगवेगळ्या १२ ठिकाणी बाँबस्फोट २५७ लोक ठार, तर सुमारे १,४०० नागरिक जखमी झाले होते. या घटनेने मुंबईच नव्हे तर, अवघा देश हादरला. दहशतवाद्यांचा हा पूर्वनियोजित कट होता. शेअर बाजार, एअर इंडियाची इमारत, झवेरी बाजार, शिवसेना भवन, सहार विमानतळ, जुहू सेंटॉर हॉटेल अशा वर्दळींच्या ठिकाणी हे स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटातील एक दोषी याकूब मेमन याला २०१५ मध्ये नागपूर येथील मध्यवर्ती तुरुंगात फाशी देण्यात आली. मात्र, स्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेले दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अद्यापही फरार आहेत.


३० सप्टेंबर १९९३ : गणेशोत्सवादरम्यान लातूरमधील किल्लारी परिसरात भूकंपाचा धक्का बसला. ४० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. लातूर- उस्मानाबाद परिसरात अपरिमित जीवित व वित्तहानी झाली.


१३ मार्च १९९५ : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव. राज्यात पहिल्यांदाच भाजप- शिवसेना युतीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेचे मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले. या सरकारने पहिला कार्यकाळ पूर्ण करण्यात यश मिळविले.


मार्च १९९५ : बॉम्बेचे नामकरण मुंबई झाले. पोर्तुगिजांच्या ताब्यात मुंबई असताना त्यांनी १५३४ मध्ये ‘बॉम बिमा’ हे नाव शहराला दिले होते. पोर्तुगिजांनी १६६१ मध्ये हे शहर ब्रिटिश चार्ल्सला (द्वितीय) भेट दिले. पुढे ईस्ट इंडिया कंपनीने शहराचे नाव ‘बॉम्बे’ केले. मुंबादेवी ही मुंबईची देवी. कोळ्यांची देवी. त्यामुळे या शहराला मुंबई म्हणावे, अशी मागणी स्वातंत्र्योत्तर कालखंडात मागणी होती. त्याची दखल घेऊन राज्यात पहिल्यांदाच स्थापन झालेल्या शिवसेना- भाजप युतीने सरकारने १९९५ मध्ये बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे केले.


१५ एप्रिल १९९५ : भारतासह १२४ राष्ट्रांच्या ‘गॅट’ ( General Agreement of Trade and Tariff - GATT) करारावर स्वाक्षऱ्या. या करारानुसार जागतिक व्यापार संघटना (WTO) स्थापन झाली. त्यामुळे जागतिक व्यापाऱ्याला चालना मिळाली. या निमित्ताने खरेदी- विक्रीसाठी जागतिक नियम अस्तित्वात आले.


१० एप्रिल १९९५ : देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे मुंबईत निधन. ते देशाचे चौथे पंतप्रधान होते. आणीबाणीनंतर केंद्रात निवडून आलेल्या जनता सरकारचे १९७७ - ७९ दरम्यान त्यांनी नेतृत्व केले होते.


११ मे १९९५ : श्रीनगरनजीक चरारे शरीफ येथील पुरातन मशीद व गाव अतिरेक्यांनी जाळून भस्मसात केले. जम्मू तसेच काश्मीर खोऱ्यात या घटनेचे तीव्र उमटले.


२७ एप्रिल १९९६ : ११ व्या लोकसभेसाठी २७ एप्रिल, २ आणि ७ मे ९६ रोजी मतदान. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सत्ताधारी कॉंग्रेसचा पराभव होऊन भाजपला सर्वाधिक म्हणजे १६१ जागा मिळाल्या. पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. परंतु, त्यांना बहुमत स्पष्ट न करता आल्यामुळे १३ दिवसांत राजीनामा द्यावा लागला.


१ जून १९९६ : एच. डी. देवगौडा यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. वाजपेयी यांनी राजीनामा दिल्यावर जनता दलाचे देवेगौडा यांना संयुक्त आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे ते पंतप्रधान झाले. ते २१ एप्रिल १९९७ पर्यंत पंतप्रधान पदावर होते.


ऑगस्ट १९९६ : उत्तर काश्मीरमध्ये हिमवर्षावात १९४ अमरनाथ यात्रेकरूंचा मृत्यू. देशातील विविध भागांतील नागरिकांचा त्यात समावेश होता. या दुर्घटनेमुळे अमरनाथ यात्रा काही काळ स्थगित करावी लागली.


५ सप्टेंबर १९९७ : नोबेल पुरस्कार प्राप्त आणि भारतरत्न मदर तेरेसा यांचे कोलकत्ता येथे निधन.


१६ फेब्रुवारी १९९८ : १२ व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक. काँग्रेसने पाठिंबा काढल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यासाठी १६, २२ आणि २८ फेब्रुवारी १९९८ रोजी मतदान झाले. त्यात भाजपला सर्वाधिक म्हणजे १८१ जागा मिळाल्या. तेलगू देसम आणि एआयएडीएमकेच्या पाठबळावर भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. ते १३ महिने टिकले.


१६ फेब्रुवारी १९९८ : जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर.


११ मे १९९८ : भारताने राजस्थानातील पोखरण येथे ५ अणुचाचण्या घेतल्या.


२८ मे १९९८ : पाकिस्तानने बलुचिस्तान परिसरात ६ अणुचाचण्या घेतल्या.


फेब्रुवारी ९९ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बसमधून पाकिस्तानातील लाहोर येथे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेण्यास गेले. (१९९९ते २००४ वाजपेयी सरकार)


१७ एप्रिल १९९९ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारचा लोकसभेत एका मताने पराभव ( २६९ विरुद्ध २७०). ‘एआयएडीएमके’ने पाठिंबा काढल्यामुळे वाजपेयी सरकारचा पराभव झाला. हे सरकार १३ महिने टिकले होते.


५ सप्टेंबर १९९९ : लोकसभा निवडणुका झाल्या. ही निवडणूक ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान झाली. त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळाले आणि पहिले बिगर कॉंग्रेस सरकार अस्तित्वात आले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले.


१० जून १९९९ : राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली.


२५ ऑक्टोबर १९९९ : वादळाचा फटका बसून ओरिसात १००० नागरिकांचा मृत्यू


२१ फेब्रुवारी फेब्रुवारी २००० : वाजपेयींची बसने लाहोर नवाज शरीफ-वाजपेयी भेट.


६ मे २००० : पाकिस्तानी सैनिक कारगिल नजीकच्या नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसले. कारगिल युद्धास सुरुवात.


१७ जुलै २००० : कारगिल युद्धाची अखेर. युद्धात ५१९ भारतीय सैनिकांना वीरगती, ६०० हून जास्त सैनिक जखमी.


२४ डिसेंबर २००० : इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे १७४ प्रवासी व ११ कर्मचारी असलेल्या विमानाचे काठमांडू (नेपाळ) येथून पाकिस्तानी अतिरेक्यांकडून अपहरण. ते अफगाणिस्तानातील कंदाहार विमानतळावर उतरविण्यात आले होते.


३१ डिसेंबर २००० : अजहर मसूदसह तीन अतिरेक्यांच्या बदल्यात विमानातील प्रवाशांची सुटका झाली. अतिरेक्यांना सोडल्यामुळे केंद्र सरकारवर मोठी टीका झाली.

 

मंगेश कोळपकर

([email protected])

(सौजन्य: दै. सकाळ)


'India@76' चा वाटचालीचा विविधांगी आढावा घेणारे हे लेखही जरूर वाचा :