मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात बाचाबाचीचे किरकोळ प्रकार वगळता उत्साहात मतदान झाले. सुरवातीपासूनच मतदानाचा जोर कायम होता. दुपारी चारनंतर सर्वच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली. दहापेक्षा अधिक केंद्रांवर सायंकाळी सहानंतर मतदान सुरु होते.
अंदाजे ७० टक्के मतदान झाले. आयशानगर भागातील बूथ क्रमांक १३ मध्ये यंत्रात बिघाड झाल्याने काहीं काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. नंतर मात्र सुरळीत मतदान पार पडले. शेख उस्मान हायस्कूल, रौनकाबाद, गयासनगर भागातील नांदेडी कॅम्पस, जेएटी हायस्कूल या ठिकाणी एमआयएम व इंडियन सेक्युलर पार्टीच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली. चारही उमेदवार व समर्थकांनी मतदारांचे आभार मानत विजयाचा दावा केला आहे.
मतदारसंघातील ३४४ केंद्रांवर सकाळी कडक पोलिस बंदोबस्तात उत्साहात मतदान सुरु झाले. मुस्लीम बहुल दाट लोकवस्तीचे शहर असल्याने मतदारांना ने-आण करण्यासाठी प्रामुख्याने रिक्षाचा वापर केला जात होता. उमेदवारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सकाळी लवकर मतदान केले. यानंतर दिवसभर कार्यकर्त्यांची मतदारांना ने आण करण्यासाठी धावपळ सुरु होती.
मतदारसंघात एमआयएमचे मौलाना मुफ्ती, समाजवादी पक्षाच्या शान ए हिंद निहाल अहमद, कॉंग्रेसचे एजाज बेग व इंडियन सेक्युलर पार्टीचे (अपक्ष) आसिफ शेख यांच्यात चौरंगी लढत झाली. चारही उमेदवारांच्या समर्थकांनी प्रत्येक केंद्राबाहेर बूथ उभारले होते. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मतदारांना घर पोहोच मतदान चिठ्ठयांचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे नावे शोधण्यात फारसा गोंधळ उडाला नाही. तरीदेखील प्रत्येक बुथवर काही नागरिक नावे शोधत होती.
यावेळी मालेगावमधील मतदार अरकम अकीब मन्सुरी यांनी सांगितले, "प्रथमच मी मतदानाचा हक्क बजावला. मी आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी लोकशाहीचा घटक ठरलो, याचा आनंद आहे. अनेक सुशिक्षित मतदार मतदानाला येत नाहीत, याची खंत वाटते."
सकाळी नऊ पर्यंत १९ हजार २५६ पुरुष व १४ हजार ९४५ महिला असे एकूण ३४ हजार २१ मतदारांनी मतदान केले. दुपारी एकपर्यंत ६५ हजार ०५५ पुरुष व ५७ हजार ७०१ महिला असे एकूण १ लाख २२ हजार ७५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर दुपारी तीनपर्यंत ८६ हजार ९०० पुरुष तर ७७ हजार ९०६ महिला असे एकूण १ लाख ६४ हजार ८०६ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी पाचपर्यंत १ लाख १० हजार ७९५ पुरुष तर १ लाख २३६ महिला असे एकूण २ लाख ११ हजार ०३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.