युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात 'यूपीआय' द्वारे होणाऱ्या व्यवहारांनी २०२४ च्या अखेरीस वाढीचा कल कायम राखत डिसेंबरमध्ये सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 'यूपीआय'च्या माध्यमातून २०२४ या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात २३.२५ लाख कोटी रुपये मूल्याचे १६.७३ अब्ज व्यवहार झाले आहेत.
संपूर्ण २०२४ मध्ये 'यूपीआय' द्वारे अंदाजे १७२ अब्ज व्यवहार झाले. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या ११८ अब्ज व्यवहारांच्या तुलनेत त्यात ४६ टक्के वाढ झाली आहे, तर २०२४ साठी एकूण व्यवहार मूल्य वर्ष २०२३ मधील १८३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढून २४७ लाख कोटी रुपये आहे.
नोव्हेंबरमध्ये 'यूपीआय' व्यवहारांची संख्या १५.४८ अब्ज होती, तर मूल्य २१.५५ लाख कोटी रुपये होते. डिसेंबरमधील व्यवहारांच्या संख्येत नोव्हेंबरच्या तुलनेत आठ टक्के वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये सरासरी दैनंदिन व्यवहारांची संख्या ५३.९ कोटी होती, जी नोव्हेंबरमध्ये ५१.६ कोटी होती. मूल्याच्या दृष्टीने, डिसेंबरमध्ये सरासरी दैनिक व्यवहाराचे मूल्य ७४,९९० कोटी रुपये होते. नोव्हेंबरध्ये ते ७१,८४० कोटी रुपये होते.