जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत आहेत. कठुआ जिल्ह्यात २३ मार्च रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा कठुआ जिल्ह्यात गुरुवारी (दि.२७) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत ३ जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले. तसेच या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.
या परिसरात पाच अतिरेकी दडले असल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी शोधमोहिमेला वेग दिला. सान्याल जंगलात पलायन केलेला अतिरेक्यांचा हाच गट आहे की, नव्याने घुसखोरी झाली आहे, हे स्पष्ट झाले नाही. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपच्या नेतृत्वाखाली लष्कर, बीएसएफ व सीआरपीएफच्या मदतीने झालेल्या या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. दाट झाडांनी दडलेल्या ओढ्यालगत गोळीबाराच्या ठिकाणी तीन सुरक्षा कर्मचारी अडकल्याची माहिती मिळत आहे.
दहशतवादविरोधी कारवाईत सामील झालेल्या लष्कराचे विशेष दलाने जुठाणा येथे कारवाई केली. जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात हे कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी पोहोचले होते. दरम्यान, गुरुवारी झालेल्या चकमकीत सहभागी असलेले दहशतवादी हेच गट होते, जे रविवारी हिरानगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पळून जाण्यात यशस्वी झाले होते.