तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्या - गृहमंत्री शहा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. "प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ई-साक्ष, न्याय श्रुती, ई-साईन आणि ई-समन्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जावा," अशी सूचना गृहमंत्र्यांनी केली.

देशपातळीवर गुन्हे आणि गुन्हेगारांवर पाळत ठेवणारी 'सीसीटीएनएस २.० कार्यप्रणाली', बोटांचे ठसे स्वयंचलित तपासणारी यंत्रणा 'नाफीस', कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा या सर्व यंत्रणांची एकमेकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठीच्या 'आयसीजेएस २.२०' या योजनेंतर्गत शाहा यांच्याकडून अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीवर नियमितपणे लक्ष ठेवण्याची आणि राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो आणि नाफीस या प्रकल्पांसाठीच्या तंत्रज्ञानाचे त्यांनी कौतुकही केले. तसेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाला आयसीजेएस २.२० च्या माध्यमातून नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या संपूर्ण अंमलबजावणीस करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.

बायोमेट्रिकच्या उपयोगावर भर
• गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ई साक्ष, न्याय श्रुती, ई साईन आणि यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जावा. अज्ञात मृतदेह आणि व्यक्तींच्या ओळखीसाठी बायोमेट्रिकचा उपयोग करावा, असेही त्यांनी सांगितले. गृहमंत्री म्हणाले, "तक्रारदार आणि पीडितांच्या हितासाठी गुन्ह्याच्या नोंदणीपासून प्रकरणाच्या निकालापर्यंत प्रत्येक टण्यावर वेळेचे बंधन पाळले जावे आणि वेळोवेळी त्यासाठीचे संदेश दिले जावेत. त्याचप्रमाणे तपास प्रक्रियेतील गती वाढवण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जाव्यात."