आणीबाणी हा संविधानावरील सर्वांत मोठा हल्ला - राष्ट्रपती मुर्मू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अभिभाषणात राष्ट्रीय लोकशाही सरकारच्या (एनडीए) तिसऱ्या कार्यकाळाची रुपरेषा मांडताना आर्थिक सुधारणांची गती कायम राखण्याचे सूतोवाच केले. पेपरफुटीच्या घटनांमधील दोषींवर कारवाईसाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. सोबतच, ‘१९७५ मध्ये लागू केलेली आणीबाणी हा संविधानावरील हल्ल्याचा सर्वांत मोठा काळा अध्याय होता,’ अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आणीबाणीवर हल्ला चढविला.

लोकसभा निवडणुकीआधी जानेवारीमध्ये झालेल्या छोटेखानी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले होते. मात्र नवी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर संसदीय प्रथेप्रमाणे पुन्हा एकदा संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना उद्देशून राष्ट्रपतींचे अभिभाषण आज झाले.

या अभिभाषणातून राष्ट्रपतींनी लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमताचा कौल एनडीए सरकारला यश मिळाल्याचा आवर्जून उल्लेख करताना भारतीयांच्या आकांक्षा हेच सरकार पूर्ण करू शकते, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी सरकारवरील विश्वास व्यक्त केला. तसेच आणीबाणीच्या मुद्द्यावरून सरकारच्या रणनितीचे स्पष्ट संकेत दिले.

सुमारे ५५ मिनिटांच्या अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींनी आयुष्मान भारत योजनेमध्ये ७० वर्षांवरील नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा मिळणार असल्याच्या सरकारच्या नव्या निर्णयाची घोषणा केली. तत्पूर्वी, राष्ट्रपतींनी आर्थिक व कृषी क्षेत्रातील सुधारणा, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची उंचावलेली प्रतिमा, रस्ते, रेल्वेमार्ग यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी, ईशान्य भारतातील राज्यांना सेमीकंडक्टर उत्पादनाचा केंद्रबिंदू बनविण्याला असलेले प्राधान्य, सैन्य आधुनिकीकरण यासारख्या मुद्द्यांवर सरकारच्या कारभाराचा प्राधान्यक्रम मांडला. त्याचप्रमाणे, देशांतर्गत अपप्रवृत्तींकडून आणि बाह्य शक्तींकडून देशात अफवा पसरविल्या जाण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावरही त्यांनी भर दिला.

पेपरफुटीच्या मुद्द्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलिकडच्या काळात झालेल्या पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. राज्यांमध्ये पेपरफुटीच्या घटना होत असून पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन यावर देशव्यापी ठोस उपाययोजनांची गरजही राष्ट्रपतींनी बोलून दाखविली.

तसेच आणीबाणीवर मतप्रदर्शन करताना सरकार राज्यघटनेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचीही ग्वाही दिली. राष्ट्रपती म्हणाल्या, की देशात राज्यघटना लागू झाल्यानंतरही त्यावर अनेक हल्ले झाले आहेत. २५ जून १९७५ ला लागू झालेली आणीबाणी म्हणजे राज्यघटनेवर हल्ला करण्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता. त्यामुळे संपूर्ण देशात हाहाःकार उडाला होता. परंतु, अशा घटनाविरोधी शक्तींवर देशाने विजय मिळवून भारतात लोकशाहीची परंपरा दृढ असल्याचे दाखवून दिले असल्याचेही राष्ट्पती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

विरोधकांचीही आक्रमकतेची चुणूक
दरम्यान, अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींकडून होणाऱ्या सर्व योजनांच्या उल्लेखाचे पंतप्रधान मोदींसह सत्ताधारी खासदारांनी बाके वाजून स्वागत केले जात होते. तर लोकसभेमध्ये आपले संख्याबळ वाढलेल्या विरोधकांनी अभिभाषण सुरू असताना मणिपूर हिंसाचार, पेपरफूट, संसदेच्या आवारातील महापुरुषांचे पुतळे हटविणे यासारख्या मुद्द्यांवरून सातत्याने शेरेबाजी करून आपल्या आक्रमकतेची चुणूक दाखवून दिली.

त्यामुळे यापुढील काळात संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष रंगणार असल्याचीही चिन्हे आज दिसून आली. ही शेरेबाजी करण्यात द्रमुकचे दयानिधी मारन, तृणमूल कॉँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, महुआ मोईत्रा हे खासदार विशेष आघाडीवर होते. राष्ट्रपतींच्या हिंदी अभिभाषणाचा संक्षिप्त इंग्रजी अनुवाद उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी वाचून दाखवला.

त्यांच्या त्यांच्या दहा मिनिटांच्या संक्षिप्त भाषणादरम्यान विरोधी पक्षांच्या खासदारांकडून झालेली शेरेबाजी सर्वाधिक होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये उद्यापासून धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू होईल. तर पंतप्रधान मोदी या चर्चेला उत्तर देतील.

अभिभाषणातील ठळक मुद्दे

  • एनडीए सरकारच भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करू शकते.

  • आणीबाणीच्या मुद्द्याने सरकारच्या रणनितीचे स्पष्ट संकेत

  • आयुष्मान भारत योजनेत ज्येष्ठांना मोफत उपचार मिळणार

  • ‘नीट’सारख्या पेपरफुटीबाबत सरकार कठोर कारवाई करणार

  • केंद्र सरकार राज्यघटनेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध