निवडणूक प्रक्रियेतील नियमावलीमधील अलीकडेच झालेला बदल मतदारांची गोपनियता कायम राखण्यासाठी नितांत गरजेचा आहे," असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज स्पष्ट केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना दिल्लीतील मतदारयाद्यांमध्ये फेरफार झाल्याचे आम आदमी पक्षाचे आरोप निराधार ठरविले. तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगताना ईव्हीएमशी कोणत्याही प्रकारची फेरफार पूर्णतः अशक्य असल्याचाही निर्वाळा दिला.
राजधानी नवी दिल्लीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक प्रक्रियेवरील आरोप आणि ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) संबंधीच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. ईव्हीएम पूर्णतः सुरक्षित असून फेरफार होण्याचा कोणताही धोका नाही. ईव्हीएमविरोधातील आरोप निराधार आहेत आणि निवडणूक प्रक्रियेवर अकारण संशय निर्माण करणे चुकीचे आहे. सर्व राजकीय पक्षांना प्रशासन चालवायचे असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी लक्ष्मणरेषा प्रचार करताना ओलांडू नका, असा इशाराही दिला.
राजीवकुमार यांनी स्पष्ट केले की, व्हीव्हीपॅट प्रणालीसह ईव्हीएम ही मतदान प्रक्रिया अधिक सुस्पष्ट व पारदर्शक बनवतात. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या यंत्रांच्या सुरक्षेसंबंची आकडेवारी आणि प्रक्रिया विशद केली. ईव्हीएममधील चिन्हे निवडणुकीपूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर घालण्यात येतात आणि त्यानंतर मंत्र मशिन सील केली जाते. मतदानानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना फॉर्म १७ सी वितरित जातो, केला त्यात मतदानाचा तपशील असतो, असे सांगितले. त्याचप्रमाणे ईव्हीएमवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह ४२ निकालांचा दाखला दिला.
निवडणूक प्रक्रियेत मतदारयाद्यांमध्ये फेरफार झाल्याचे आरोप नाकारताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी आयोगाची मतदार नोंदणीची व नावे वगळण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून त्यात वेळोवेळी राजकीय पक्षांचा सहभाग असतो, असे सांगितले. ते म्हणाले, मतदारयादीत कोणताही बदल हा फॉर्म ६ किंवा फॉर्म-७ भरल्याशिवाय होत नाही. यादीतील प्रत्येक बदलाची माहिती पक्षांना दिली जाते. कोणत्याही मतदाराचे नाव हटवण्याआधी त्याला वैयक्तिकरीत्या सुनावणीसाठी संधी दिली जाते.
मतदानाच्या टक्केवारीवर सवालही गैरसमजातून असल्याचा दावा मुख्य निवडणूक आयुक्तांनी केला. ते म्हणाले, की मतदानाच्या टक्केवारीवर लावले जाणारे आरोप चुकीच्या आकलनावर आधारित असतात. मतदानानंतर उशिरा आलेल्या आकडेवारीचे कारण सांगताना त्यांनी मतदान अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळापत्रकाचा उल्लेख केला. मतमोजणीच्यावेळी देखील पारदर्शकता राखली जाते. उमेदवार आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जारी, असे निवडणूक आयुक्त म्हणाले.
फुटेज देता येणार नाही
मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक न करण्याबद्दलच्या निवडणूक नियमावलीमध्ये बदलांवर झालेल्या टीकेलाही आयुक्तांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “नियमांमधील सुधारणा पारदर्शकतेवर आधारित असून केवळ मतदान केंद्राच्या आतील आणि बाहेरील सीसीटीव्ही फुटेज देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यातून प्रत्येक मतदाराची ओळख, मतदानाची वेळ, कोणासोबत मतदान केले ही गोपनीयता जगजाहीर होण्याची शक्यता आहे. या तपशिलाचा गैरवापर होऊ शकतो. तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून 'फेक' व्हिडिओ तयार झाल्यास गोंधळही उडू शकतो, असाही दावा मुख्य निवडणूक आयुक्तांनी केला.”
जबाब तो बनता है....!
निवडणूक आयोगावर झालेल्या आरोपांना मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शायरीचा आधार घेत उत्तर दिले. सर्वांना प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकशाहीने दिला असून, आम्हीही त्या अधिकारांचा आदर करतो. या सर्व प्रश्नांचा मान राखताना त्यांची उत्तरही आज देणार आहोत, असे म्हणत राजीवकुमार यांनी 'सब सवाल अहमियत रखते हैं, जबाब तो बनता है। आदतन कलमबंद जवाब देते रहे, आज रुबरु भी बनता है। क्या पता कल हम हो न हों, आज जवाब तो बनता है, आज जबाब तो बनता है', अशा ओळी ऐकवल्या.
... ३६०० वर्षे लागतील !
मतदान केंद्रांच्या आतील आणि बाहेरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सार्वजनिक करणे चुकीचे असल्याचे सांगताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, देशभरात साडेदहा लाख मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रांवरील दहा ते बारा तासाचे रेकॉर्डिंग पाहता एकूण रेकॉर्डिंग एक कोटी तासांचे होते. हे चित्रीकरण रोज आठ तास पहायचे झाले तरी बघणाऱ्याला ३६०० वर्षे लागतील आणि एआय तंत्रज्ञानाच्या आधारे या तपशीलाचा गैरवापर झाला तर किती गोंधळ उडेल, अशी चिंता मुख्य निवडणूक आयुक्तांनी बोलून दाखविली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter