देशात 'या' ठिकाणी १३ ऐवजी आता २० नोव्हेंबरला मतदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन राज्यांतील पोटनिवडणुकीच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. इतर पोटनिवडणुकींच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

भाजप, काँग्रेससह इतर काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. ही मागणी आयोगाने मान्य केली आहे. निवडणूक पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यांमध्ये यापूर्वी १३ नोव्हेंबरला मतदान होणार होते. आता या राज्यांत २० नोव्हेंबरला होणार आहेत.
संबंधित राज्यांमध्ये निवडणुकीच्या काळात विविध सण-उत्सव आहेत. त्यामुळे या काळात मतदारांना मतदान करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा १३ नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा २० नोव्हेंबरला होणार आहे. तर महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आहे.

केरळमध्ये पलक्कड या एकमेव विधानसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार होती. पंजाबमध्ये डेरा बाबा नानक, चब्बेवाल, गिद्देरबहा आणि बर्नाला या चार मतदारसंघात याचदिवशी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशात मिरापूर, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहल, सिशामाऊ, फुलपूर, कटेहरी आणि माझवान या नऊ मतदारसंघात निवडणूक होणार आहे. आता त्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अधिक कालावधी मिळणार आहे.

प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजप आणि समाजवादी पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा निम्म्याने कमी झाला. तर समाजवादी पक्षाने ३३ जागांवर विजय मिळवत मोठा विजय मिळवला. यापार्श्वभूमीवर नऊ जागांवर पोटनिवडणूक होत असून लोकसभेप्रमाणेच समाजवादी पक्षाला यश मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.