'व्होट जिहाद', 'बटेंगे तो कटेंगे', 'धर्मयुद्ध' अशा वादग्रस्त घोषणांबाबत किमान १५ अहवाल निवडणूक आयोगाच्या राज्य शाखेने मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील काही अहवाल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पाठवले होते, तर काही प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाने स्वतःहून अहवाल मागवले होते. त्यापैकी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा अत्यंत वादग्रस्त ठरला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रद्रोही आणि राष्ट्रप्रेमी या शब्दांचा उल्लेख केला होता. निवडणूक आयोगाने या दोन्ही शब्दांवर देखील आक्षेप घेतला आहे.
मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकून 'व्होट जिहाद'साठी केलेल्या आवाहनावरही हा अहवाल पाठवण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी चांदिवलीत रोड शो केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीचीही निवडणूक आयोग चौकशी करत आहे.
गुंडगिरीची दखल
निवडणूक आयोगाने हिसाचार, मतदान केंद्रांवरील गुंडगिरी, रोख रकमेचे वाटप ही प्रकरणे अत्यंत गांभीर्याने घेतली आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ऑक्टोबरपासून प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये ६५९ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी १५० गुन्हे बुधवारी मतदानाच्या दिवशी दाखल झाले.