कॉंग्रेसच्या 'या' तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व 'ईव्हीएम' बद्दल करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला म्हणणे मांडण्यासाठी निमंत्रित केले आहे. 

येत्या मंगळवारी (ता.३) काँग्रेसचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आपली बाजू मांडेल. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून प्रत्यक्ष भेटीची मागणी केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार मुकुल वासनिक व पक्षप्रभारी रमेश चेत्रीथला यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी यात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागाबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे म्हणणे निवडणूक आयोग ऐकून घेणार आहे. 

काँग्रेसने मतदान प्रक्रियेदरम्यान काही तासांतच ७६ लाख मतदान वाढल्याचा तसेच जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या काळात राज्यात ४७ लाख मतदार वाढल्याचा आरोप आहे. काँग्रेसने ईव्हीएममध्ये काही फेरफार झाल्याचाही आरोप केला आहे. तत्पूर्वी हरियाना निवडणुकीच्यावेळी सुद्धा काँग्रेसने हे आरोप केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की काँग्रेसच्या कायदेशीर चिंतेचा आढावा घेण्यात येईल. काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांना लेखी उत्तर दिले जाईल. निवडाएक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेतले जाते व त्यांना पूर्ण माहिती दिली जाते.

मतदानप्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या 'ईव्हीएम बद्दलच्या आक्षेपांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने काँग्रेसला निमंत्रण दिले असले तरीसुद्धा ते स्वीकारायचे की नाही? याचा निर्णय दिल्लीतील पक्षाची कार्यकारिणी घेणार आहे. या संदर्भात महाराष्ट्रात कोणताही निर्णय होणार नाही. 

या आक्षेपांविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महणाले की केवळ 'ईव्हीएम'च नव्हे तर काँग्रेसला अनेक गोष्टींबाबत आक्षेप आहेत खरे तर 'व्हीव्हीपॅट'च्या चिठ्ठया मोजल्या तरी नेमकी किती मते पडली हे लक्षात येऊ शकेल. 

यामुळे निवडणुकीत घोळ झाला आहे की नाही हे समजू शकेल. मात्र एवढे छोटे पाऊल न उचलता उगाचच काथ्याकूट करणे ही पद्धत गूढ आहे अन् त्यामुळे अनेक शंका उपस्थित होतात. प्रत्येक उमेदवाराजवळ असलेले व्हीव्हीपॅटचे कागद मोजून पाहिले तर नक्की किती मतदान झाले आणि तेवढेच निवडणूक आयोगाने नोंदविले आहे का? हे लक्षात येईल. पाच उमेदवारांनी व्हीव्हीपॅटच्या चिठ्या एकत्र आणल्या तरी या संदर्भातील उलगडा होऊ शकतो. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केवळ 'ईव्हीएम'वरच आमचा आक्षेप आहे असे नाही तर मतदार याद्या, मतदानाची प्रक्रिया, मतदानाचा कालावधी तसेच मतदानाची वेळ संपल्यानंतर तेथे हजर असलेले नागरिक या सर्वच बाबतीत आमच्या मनात शंका असल्याचे सांगितले. 

... त्यांनी संवेदनशीलता दाखवावी  
मतदान किती झाले? मतदानामध्ये कोणाला किती वेळ दिला? किती मते मिळाली? रांगा किती होत्या, खरोखरच मतदान किती झाले? या सर्व गोष्टी समोर आल्या तर त्याचा लाभ होईल, परंतु या दृष्टीने कोणीही कोणत्याही प्रकारचे पाऊल टाकत नाही हीच खरी खंत आहे. विजयी झालेल्या पक्षाने यासंदर्भात संवेदनशील दाखविणे गरजेचे असल्याचेही लोंढे यांनी नमूद केले. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter