AI बाबत निवडणूक आयोगाने दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे.  दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) गुरुवारी राजकीय पक्षांना आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून बनवलेले फोटो, व्हिडीओ आणि इतर प्रचार साहित्यांवर 'AI generated' असा स्पष्ट उल्लेख करावा, असे निर्देश दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षानांना पत्र लिहिले आहे. निवडणूक प्रचारात एआयचा वाढता वापर लक्षात घेता आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना डीप फेक आणि एआयच्या वापरापासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता आयोगाकडून आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापरासंदर्भात नवी सुचना जारी करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, "निवडणूक प्रचारादरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून तयार करण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओचा मतदारांवर प्रभाव पडतो. त्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर अशा पोस्ट शेअर करताना त्यावर 'AI generated' असा स्पष्ट उल्लेख करावा." 

पुढे म्हटले आहे की, ''पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत'', असही निवडणूक आयोगाने राजकयी पक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच ''राजकीय पक्षांनी प्रचारदरम्यान एआयचा वापर जबाबदारीने करावा'', अशी सुचनाही आयोगाकडून करण्यात आली आहे.