काश्मीरमधील संवेदनशील भाग मानल्या जाणाऱ्या लाल चौक येथील पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या २४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. एवढ्या वर्षाच्या या परंपरेला आता सार्वजनिक रूप प्राप्त झाल्याचं बघायला मिळत आहे. यंदा या उत्सवाने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय काश्मीर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी काश्मीर नागरिकांनी जपलेल्या परंपरेचे कौतुक करत संवेदनशील परिस्थितीत गणेशोत्सवानिमित्त दिसणाऱ्या काश्मीरच्या सामाजिक व धार्मिक एकोप्याने ते भारावून गेले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘काश्मीरच्या लाल चौकात गणेशोत्सव साजरा होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. काश्मीरमध्ये १०० हून अधिक मराठी कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील गणेशोत्सवात मराठी कुटुंबीयांसोबतच काश्मिरी मुस्लीम, काश्मिरी पंडित, शीख, बंगाली हेही तितक्याच उत्साहानं सहभागी होतात. हा एकोपा, सलोखा आणि शांती काश्मीरसह संपूर्ण भारतात अखंड टिकून राहावी.’’
पुण्यातील ‘सरहद’ संस्थेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी काश्मीरमध्ये गणेशभक्तीचे आगळेवेगळे रूप बघायला मिळत असल्याचे सांगितले. या गणेशोत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण झाले असून एकोप्याचे दर्शन घडते. या कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, वैभव वाघ, सचिन जामगे आदी उपस्थित होते.