दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न - अर्थमंत्री सीतारामन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
अर्थमंत्री निर्मला सीतारामन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन

 

येत्या काही वर्षात नागरिकांचे दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याने नागरिकांचे जीवनमान अत्यंत वेगाने उंचावलेले दिसेल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज येथे दिली. तिसऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेत त्या बोलत होत्या. शहरी तसेच ग्रामीण भागाचाही विकास होत असल्याने विषमता वेगाने कमी होत असल्याचा दाखला त्यांनी अधिकृत आकडेवारीच्या साह्याने दिला.

कोरोनाच्या काळातील खुंटलेली अर्थव्यवस्थेची प्रगती आता इतिहास जमा झाली आहे. गेल्या दहा वर्षात झालेल्या आर्थिक आणि मूलभूत सुधारणा आता त्यांची फळे दाखवू लागल्या आहेत. त्यामुळे हा विकास सतत होतच राहील आणि देशातील सर्वसामान्यांच्या जीवनमानातही पुष्कळ सुधारणा होईल. त्यामुळे हा कालखंड भारतातील वास्तव्यास अत्यंत सुखकर असा राहील असेही त्या म्हणाल्या. 

भारतीयांचे उत्पन्न दरडोई २,६३० अमेरिकी डॉलर एवढी होण्यास गेली ७५ वर्षे लागली. मात्र त्यात आणखीन दोन हजार अमेरिकी डॉलरची भर पडण्यास आता फक्त पाच वर्षे लागतील. भूराजकीय तणाव असले तरीही हा विकास होईलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २०४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होत असून यादरम्यानचा नवा भारत हा विकसित देशांप्रमाणेच बदललेला असेल. हा विकसित भारत आपल्या विकासाची फळे फक्त भारतीयांनाच देणार नाही तर आपल्या नवकल्पना, तंत्रज्ञान आणि संस्कृती यामुळे साऱ्या जगालाही त्याचा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय बँकिंग यंत्रणेमधील निर्धोकपणा आणि मालमत्तेतील नियमित वाढ, बुडीत कर्जासाठी केलेली पुरेशी तरतूद आणि भांडवली पर्याप्तता तसेच नफ्यातील वाढ ही भारताच्या यशस्वी बँकिंग क्षेत्राची वैशिष्ट्ये आहेत. बँकांच्या एनपीएनी आता तळ गाठला आहे आणि बँकांकडे कर्जवसुलीची अत्यंत प्रभावी साधने आहेत, असे त्यांनी दाखवून दिले. भारतातील तरुणांची वाढती लोकसंख्या ही उत्पादनवाढ तसेच बचत आणि गुंतवणूक यांचा मुख्य आधार असेल.

तरुणांच्या संख्येत वाढ
दोन दशकात भारतातील तरुणांची संख्या वाढली असून अन्य विकसित देशांना मात्र हा फायदा मिळणार नाही. त्यामुळे देशातील मागणी आणि वापर येत्या दहा वर्षात वाढणार आहे. सध्या देशातील ४३ टक्के नागरिक हे २४ वर्षपिक्षा तरुण आहेत. त्यामुळे अजूनही त्यांची मागणी तेवढी मोठ्या प्रमाणावर वाढली नाही. हे तरुण नियमित ग्राहक झाले की मागणी आणखी वाढेल. तसेच मध्यमवर्गीयांची वाढती संख्याही मागणीत आणखीनच भर घालेल. त्यामुळे परदेशी गुंतवणूक आणि मोठी बाजारपेठ ही भारताची वैशिष्ट्ये असतील, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter