नागपूर पोलिसांसोबत बैठकीतून अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नागपूरच्या घटनेचा आढावा घेतला.
नागपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरातील विविध संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली. नुकतेच अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या हिंसाचार प्रकरणात त्यांनी नागपूर पोलिसांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर अन्याय होणार नाही. तसेच दोषींना कठोर शिक्षा मिळेल, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागपूर पोलीस आणि प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून पडद्यामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा, असे निर्देश दिले.
काय म्हणाले प्यारे खान
नागपूरच्या महाल परिसरात उसळलेल्या दंगलीनंतर या घटनेच्या मुळाशी नेमके काय कारण होते, याचा शोध घेतला जात आहे. काही लोकांनी औरंगजेबाच्या कबरीसंदर्भातील वादामुळे तणाव निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांसोबतच्या बैठकीनंतर प्यारे खान यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, “नागपूरमधील हिंसाचार औरंगजेबाच्या कबरीवरून झाला नाही. त्यामागील वास्तविक कारणे शोधण्यासाठी पोलिसांनी चौकशी करावी. नागपूर नेहमीच शांती आणि सौहार्दाचे प्रतिक राहिले आहे. नागपूरमध्ये नेमका हिंसाचार कशामुळे झाला याचा शोध पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून घेतला जात आहे.”
या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक वाहनेही जाळण्यात आली. याविषयी ते म्हणाले, “मी हिंदू मुस्लिम समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. दोन्ही समाजातील लोकांनी आमच्याकडे या घटनेसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. आयोग त्या तक्रारींची सत्यता पडताळून पाहत आहे. या घटनेत ज्या नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना ४८ तासांच्या आत नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. सध्या रमजान सुरू आहे. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मोमिनपुरा आणि इतर बाजारपेठांमध्ये संचारबंदी शिथील करण्याची मागणीही केली आहे. ही संचारबंदी उठली तर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल.”
प्रशासनाचा आदर करा - प्यारे खान
नागपूर पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक जणांना अटक केली आहे. यामध्ये सात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले आहे. पोलिस सध्या हिंसाचाराच्या सूत्रधारांचा शोध घेत आहेत. प्यारे खान म्हणाले, “हिंदू-मुस्लिम बांधवांनी शांतता राखावी. दोन्ही समाजांनी प्रशासनाचा आदर करा. पोलिस आणि प्रशासन २४ तास आपल्यासाठी काम करत आहे. ते स्वतःसाठी काम करत नाही. या घटनेत दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही.”
या घटनेवर बोलताना सैय्यद मुश्ताक म्हणाले, “आजपर्यंत नागपुरात कधीही अशी घटना घडली नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वच समूदायाचे लोक येथे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहात आले आहेत. परिस्थिती वेळीच योग्यप्रकारे हाताळली गेली असती तर, निश्चितच ही घटना टाळता आली असती. दुर्दैवाने काही समाजकंटकांनी आगीत तेल टाकल्याने भडका उडाला आणि तणाव निर्माण झाला. पोलिसांनी जीव थोक्यात टाकून कारवाई केल्याने शांतता प्रस्थापित होऊ शकली. मात्र या घटनेने निरपराध व गोरगरिबांचेच खूप नुकसान केले आहे. एक सामान्य नागरिक या नात्याने मलासुद्धा व्यक्तिशः खूप दुःख व वेदना झाल्या आहेत.”
पोलिसांनी या प्रकरणात चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, नागपूर पोलिसांच्या सायबर सेलच्या तपासात असे आढळले की, काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर हिंसेचे व्हिडीओ संपादित करून त्याचा गैरवापर केला आहे. मुख्य आरोपी फहीम खान याने हे व्हिडीओ एडिट करून व्हायरल केले आणि त्याद्वारे दंगलीला खतपाणी घातल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. फहीम खानला १९ मार्चला अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितले की, “नागपूरमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी काही भागांमध्ये शिथील करण्यात आली आहे. परिस्थिती आटोक्यात येत असल्याने हळूहळू निर्बंध शिथील करण्यात येतील.”
नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सांगितले की, “या हिंसाचारात वाहने आणि अन्य मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी आरटीओ कार्यालयात विशेष कॅम्प लावण्यात येणार आहे.” या कॅम्पमधून त्यांना मदत केली जाऊ शकते.
दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपींवर मकोका आणि एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूर पोलिसांनी जाहीर केले की, संपूर्ण तपासानंतरच अंतिम निष्कर्षावर पोहोचता येईल. सध्या समाजात शांतता प्रस्थापित करणे हेच प्राथमिक उद्दिष्ट आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक तेढ वाढवणाऱ्या अफवांपासून दूर राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन नागपूर प्रशासनाने केले आहे.