राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी १९८८ च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांची मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत असणार आहे.
कोण आहेत ज्ञानेश कुमार
ज्ञानेश कुमार यांचा जन्म २७ जानेवारी १९६४ रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला. वाराणसीतील किन्स कॉलेज आणि लखनौमधील कॉल्विन तालुकेदार कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले. त्यानंतर, आयसीएफएआयमधून बिझनेस फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि हॉर्वर्ड विद्यापीठातून पर्यावरण अर्थशास्त्र विषयातही पदव्युत्तर पदवी संपादन केली.
१९८८ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेसाठी त्यांची निवड झाली. केरळमधील एर्नाकुलम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. नंतर, अडूरचे उपजिल्हाधिकारी, राज्य अनुसूचित जाती आणि जमाती विकास परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक, कोचीन पालिकेचे आयुक्त अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले.
पुढे, केरळ प्रशासनामध्ये अर्थ, सार्वजनिक बांधकाम, जलदगती प्रकल्पांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले. केंद्र सरकारमध्ये संरक्षण विभागाचे सह सचिव, गृह मंत्रालयाचे सह सचिव आणि अतिरिक्त सचिव, संसदीय कार्य मंत्रालयाचे सचिव, तसेच सहकार विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या.
केंद्रीय गृह मंत्रालयात कार्यरत असताना, त्यांनी कलम ३७० रद्द केल्यानंतर निर्णयांची अमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, केंद्र सरकारने त्यांना राम मंदिर ट्रस्ट सदस्य म्हणूनही नियुक्त केले होते.
१४ मार्च २०२४ रोजी त्यांची केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ते मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील.
निवडणूक आयुक्त म्हणून विवेक जोशी यांची नियुक्ती
ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीनंतर रिक्त झालेल्या निवडणूक आयुक्त पदावर १९८९ च्या बॅचचे हरियाणा केडरचे अधिकारी डॉ. विवेक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पदभार स्वीकारतील.
नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, आगामी बिहार विधानसभा निवडणुका आणि २०२६ मध्ये होणाऱ्या केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांवर देखरेख ठेवली जाईल. याचवर्षी तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत.
नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे ज्ञानेश कुमार हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. या कायद्यात निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या नियुक्ती प्रक्रियेत सरन्यायाधीशांच्या ऐवजी गृहमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिली. या समितीत केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश होता.