'यामुळे' सीमेवरील शांती समझोता चीनला मान्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पूर्व लडाखमधील भारत आणि चीनदरम्यानचा लष्करी तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. दोन्ही देशांत गस्ती व्यवस्थेवरून सुरू झालेली चर्चा कराराच्या पातळीवर पोचली असून, सोमवारी भारताने याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतर आज चीननेदेखील त्याला दुजोरा दिला आहे.

या कराराच्या अनुषंगाने भारत - आणि चीनदरम्यान लष्करी आणि रणनितीक मागनि देखील बरीचशी चर्चा झाली होती. ही चर्चा आता फलद्रुप झाल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जियान यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. याप्रकरणी दोन्ही बाजू ठरावाच्या पातळीवर पोचल्या आहेत असे त्यांनी सांगितले. ज्या गोष्टी कराराच्या पातळीवर पोचल्या आहेत त्याची अंमलबजावणी करता यावी म्हणून आम्ही भारतासोबत काम करू," असे सूचक वक्तव्य करत जियान यांनी यावर आणखी भाष्य करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. 

रशियामध्ये होत असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. याबाबत काही ताजी माहिती असेल तर आम्ही त्याबाबतची तुम्हाला नक्की कळवू असेही चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून माध्यमांना सांगण्यात आले. भारत आणि चीनदरम्यान मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या लष्करी वादाबाबत तोडगा काढण्यात आला असून या करारामुळे भविष्यातील गलवानसारखे संघर्ष टाळता येतील असे बोलले जाते. आता दोन्ही देशांच्या लष्करांनी माघार घेतल्याने पूर्वी ज्या ठिकाणी दोघांचे लष्कर गस्त घालत होते त्याच ठिकाणांवर त्यांना गस्त घालता येईल, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले होते.

याविषयी बोलताना नौदलाचे उपप्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन म्हणतात, " भारत आणि चीनदरम्यान झालेल्या समझोत्यामुळे नौदलाला अत्यानंद झाला असून, या संवेदनशील अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढणे तितकेसे सोपे नव्हते. या सगळ्या कराराचा फारसा तपशील मला ठावूक नाही, पण जी काही पावले टाकण्यात आली, त्याचे स्वागतच करावे लागेल." 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter