'यामुळे' भारत कतार द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांची भेट

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून कतारच्या अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांचा दोन दिवसीय दौरा नुकताच पार पडला. अल-थानी यांच्यासोबत  मंत्री, अधिकारी आणि व्यावसायिक असे उच्चस्तरीय शिष्टमंडळ या दौऱ्यासाठी आले होते. त्यांचा हा दूसरा भारत दौरा होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवणाच्या परिसरात अल-थानी यांचे औपचारिक स्वागत केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल-थानी यांच्यात द्विपक्षीय संबंधांसाह विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. याविषयी प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती दिली. त्यांनी लिहले, "कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी भेट झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली कतारने प्रगतीची नवी उंची गाठली आहे. भारत-कतार मैत्रीसाठीही ते वचनबद्ध आहेत. आमची भेट आणखी खास आहे कारण आम्ही आमचे संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढवले ​​आहेत."
कतारच्या  अमिरांशी चर्चा केल्यानंतर प्रधानमंत्री मोदी लिहतात, "आमच्या चर्चेत व्यापार आणि द्विपक्षीय संबंध ठळकपणे दिसून आले. आम्हाला भारत-कतार व्यापारी संबंध वाढवायचे असून त्यात विविधता आणायची आहे. आपणही ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया, फार्मा आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या क्षेत्रातही काम करू शकतो.
याशिवाय पंतप्रधान मोदी आणि अमीर शेख तमीम यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि कतारच्या ऐतिहासिक संबंधांबद्दल विचारांची देवाणघेवाण केली आणि दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच, द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी स्थापनेवर करार झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

नवीन धोरणात्मक भागीदारीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी अनेक क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याची वचनबद्धता व्यक्त केली. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान, शाश्वतता आणि लोक-ते-लोक संबंधांचा समावेश आहे. दोन्ही देशांनी दुहेरी कर टाळण्याच्या करारावर सुद्धा सहमती दर्शविली.

व्यापार आणि वाणिज्य या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी एक संयुक्त व्यापार आयोग स्थापन करण्याचे ठरवले आहे. या आयोगाचे नेतृत्व वाणिज्य आणि उद्योग मंत्री करतील. तसेच, भारत आणि कतारने द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

कतारने भारतातील गुंतवणूक वाढवण्याबाबत पुढाकार घेतला आहे. कतारचे गुंतवणूक प्राधिकरण भारतात कार्यालय उघडणार आहे. भारताने कतारच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा आणि इतर क्षेत्रांत गुंतवणूक संधी शोधण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

दोन्ही देशांनी आर्थिक सहकार्याच्या विविध क्षेत्रात सहकार्य करण्याचे ठरवले असून, व्यावसायिक संघटनांमधून सहकार्य करण्यास महत्व दिले. या संदर्भात, त्यांनी एक संयुक्त व्यवसाय मंच तयार केला आहे.

द्विपक्षीय ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देश काम करतील. दोन्ही नेत्यांनी परस्पर संरक्षण, माहिती सामायिकरण, आणि सुरक्षा सहयोग वाढवण्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी सायबर सुरक्षा आणि मनी लाँडरिंगसारख्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांवरही चर्चा केली. 

आरोग्य आणि शैक्षणिक सहकार्य हे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्वाचे भाग आहेत. कोविड-१९ महामारी दरम्यान घेतलेल्या संयुक्त कार्यगटाच्या कामाचे दोन्ही देशांनी कौतुक केले. तसेच, दोन्ही देशांमधील शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी देवाणघेवाण अधिक वाढवण्याचे ठरवले. 

दोन्ही नेत्यांनी आपल्या ऐतिहासिक लोक-ते-लोक संबंधांची आणि कतारमधील भारतीय समुदायाची देखील प्रशंसा केली. भारतीय समुदायाच्या योगदानाबद्दल कतारच्या नेतृत्वाने आभार व्यक्त केले. कतारने भारताच्या नागरिकांना ई-व्हिसा सुविधा उपलब्ध केली आहे. मानवी संसाधनांच्या क्षेत्रात दोन्ही देशांनी सहकार्य वाढवण्याची वचनबद्धता व्यक्त केली. दोन्ही देशांनी प्रवासी, कामगारांचे सन्मान आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नियमित बैठका घेण्याचे ठरवले.

आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर, दोन्ही देशांनी संवाद आणि राजनयिकतेचा वापर करून समाधान शोधण्याची आवश्यकता अधोरेखित केली. दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवरही विचारांची देवाणघेवाण केली.

या करारांवर झाली स्वाक्षरी
  • द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी स्थापनेवरील करार
  • दुहेरी कर टाळणी करार
  • आर्थिक सहकार्यावरील सामंजस्य करार
  • युवा आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करार
  • शैक्षणिक सहकार्यावरील सामंजस्य करार
  • इन्व्हेस्ट इंडिया आणि इन्व्हेस्ट कतार यांच्यातील सामंजस्य करार

    'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

    Awaz Marathi WhatsApp Group 
    Awaz Marathi Facebook Page

    Awaz Marathi Twitter