डॉक्टर व्ही नारायणन इस्रोचे नवे प्रमुख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
डॉक्टर व्ही नारायणन
डॉक्टर व्ही नारायणन

 

अंतराळ शास्त्रज्ञ व्ही नारायणन हे इस्रोचे नवे प्रमुख असणार आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी याबाबतची घोषणा केली. याशिवाय व्ही नारायणन यांच्याकडे अंतराळ सचिव पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ असून व्ही नारायणन १४ जानेवारीला पदाची सूत्रे हाती घेतील.

व्ही नारायणन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. सध्या ते वलियमाला इथल्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम सेंटरचे संचालक आहेत. वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेल्या नारायणन यांच्याकडे अंतराळ क्षेत्रातला ४० वर्षांचा अनुभव आहे. ते रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनचे तज्ज्ञ आहेत.

व्ही नारायणन यांनी १९८४ मध्ये इस्रोत कामाला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या साडे चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात काम केलं. तिथं साउंडिग रॉकेट, ऑगमेटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल यावर काम केलं.

१९८९ मध्ये आयआयटी खडगपूरमधून त्यांनी क्रायोजेनिक इंजिनिअरिंगमध्ये एम टेक पूर्ण केलं. त्यानंतर एलपीएससीमध्ये कामाला सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली एलपीएससीमध्ये इस्रोने वेगवेगळ्या मोहिमांसाठी १८३ एलपीएस आणि कंट्रोल पावर प्लांट तयार केले.

जीएसएलव्ही एमके III वाहनाचे सी२५ क्रायोनिक प्रोजेक्टचेही नारायणन हे संचालक होते. पीएसएलएव्हीच्या दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय आदित्य स्पेसक्राफ्ट, जीएसएलव्ही एमके III, चंद्रयान २, चंद्रयान ३ च्या प्रोपल्शन सिस्टिममध्येही त्यांनी योगदान दिलं होतं.

इस्रोचे सध्याचे प्रमुख एस सोमनाथ यांचा कार्यकाळ १४ जानेवारी २०२२ रोजी संपणार आहे. ३ वर्षांच्या कार्यकाळानंतर ते निवृत्त होत आहेत. सोमनाथ यांच्या कार्यकाळात इस्रोने इतिहास घडवला. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान ३ चे लँडिंग केलं. याशिवाय सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल १सुद्धा लाँच करून मोठी कामगिरी केली.