डॉ. डॉ. अल-इसा राष्ट्रपती मुर्मू यांना अभिवादन करताना
जगभरातील मुस्लीमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुस्लीम वर्ल्ड लीग संघटनेचे प्रमुख डॉ. मोहम्मद बिन अब्दुल करीम अल-इसा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
पहिल्यांदाच भारतभेटीवर आलेल्या डॉ. अल- इसा यांचे राष्ट्रपतींनी स्वागत केले. जगातील सांस्कृतिक आणि धार्मिक वैविध्य टिकून राहावे, ते अधिक वृद्धिंगत व्हावे याबाबत मुस्लीम वर्ल्ड लीगच्या भूमिका आणि उद्देश यांचे भारताला विशेष कौतुक असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. आंतरधर्मीय सुसंवाद, सहिष्णुता, उदारमतवादी इस्लाम यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी संघटनेकडून सुरु असललेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसाही केली.
त्या पुढे म्हणाल्या, 'धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य हे भारताचे वैशिष्ट्य राहिले आहे. या देशात २० कोटींहून अधिक मुस्लीम गुण्यागोविंदाने नांदतात. जगातील दुसरी सर्वांत मोठी मुस्लीम लोकसंख्या इथे आनंदाने राहते आहे.'
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सौहार्दापूर्ण संबंधांचाही उल्लेखही राष्ट्रपतींनी केला, 'दोन्ही देशांचे सांस्कृतिक आणि व्यापारिक संबंध पुरातन काळापासून राहिले आहेत. दोन्ही देशांनी जगाच्या संस्कृतीत मोठे योगदान दिले आहे.'
दोन्ही देशांच्या सामाईक दृष्टीकोनाविषयीही राष्ट्रपतींनी सूचक वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, 'भारताप्रमाणेच सौदी अरेबियासुद्धा सर्व प्रकारच्या दहशदवादाचा विरोध करत आलेला आहे. दहशतवादाबाबत दोन्ही राष्ट्रांची भूमिका 'झिरो टॉलरन्स'चीच राहिली आहे.
दहशतवाद आणि मूलतत्ववाद यांचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन अवलंबला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रपती मुर्मू आणि डॉ. अल-इसा यांनी एकमुखाने घेतली. त्यासाठी धर्माचा उदारमतवादी अर्थ लावणाऱ्या विचारांचा आधार घेणे अत्यंत आवश्यक आहे यावरही दोन्ही मान्यवरांचे एकमत झाले.
डॉ. अल-इसा यांची मूलतत्ववाद, दहशतवाद आणि हिंसा यांविरोधातील स्पष्ट आणि जाहीर भूमिकेची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. डॉ. अल- इसा यांच्या भारतभेटीमुळे मुस्लीम वर्ल्ड लीग सोबत काम करण्याच्या नव्या संधी भारताला उपलब्ध होतील असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
मुस्लीम वर्ल्ड लीग प्रमुख डॉ. अल-इसा यांच्या भारतभेटीशी संबंधित हे इतर लेखही वाचा :