पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत डॉ. अल-ईसा.
पाच दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले मुस्लिम वर्ल्ड लीगचे प्रमुख शेख मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-ईसा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताच्या संविधानाचा गाभा, येथील विविधता यांसारख्या अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. ही चर्चा सुमारे तासभर चालली. पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओ आणि वर्ल्ड मुस्लीम लीग या दोहोंनी या मुलखातीविषयी ट्वीट करत माहिती दिली.
त्यांतर डॉ. अल-इसा एका महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. खुसरो फाउंडेशनने दिल्लीतील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर येथे आयोजित केलेल्या शांती परिषदेला त्यांनी संबोधित केले. यावेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचेही भाषण झाले.
भारताबाबत काय म्हणाले अल-ईसा?
विविधेत एकता हे वैशिष्ट्य असलेला भारत सौहार्दपूर्ण सहजीवनाचे एक आदर्श मॉडेल आहे. भारत जगाला शांतीचा संदेश देऊ शकतो, असे गौरवोद्गार डॉ. अल-इसा यांनी काढले. भारतीय मुस्लिमांना आपल्या देशावर आणि संविधानावर गर्व आहे. भारतातल्या धार्मिक सौहार्दाविषयी त्यांना प्रचंड अभिमान असल्याचे आम्हाला जाणवले, अशी पुस्तीही डॉ. अल-इसा यांनी यावेळी जोडली. यावेळी भारतीयांच्या विवेकाचेही (Indian Wisdom) त्यांनी कौतुक केले. भारतीयांच्या या प्रज्ञेविषयी आम्ही बरेच ऐकून आहोत. मानवतेसाठी त्याने भरीव योगदान दिले आहे, हे सांगायला डॉ. अल-इसा विसरले नाहीत.
भारतात कोणत्याही धर्माला धोका नाही : डोवाल
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे कार्यक्रमात म्हणाले, “भारतात कोणत्याही धर्माला धोका नाही. इथे सर्वांना समान अधिकार आहेत. देशात इस्लामला महत्त्वाचे स्थान आहे. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांमध्ये इंडोनेशियानंतर भारताचाच क्रमांक लागतो. वर्ल्ड मुस्लीम लीगच्या ३० हून अधिक सदस्य राष्ट्रांतील एकूण मुस्लीम लोकसंख्येपेक्षाही अधिक मुस्लीम भारतात राहतात. ” ते पुढे म्हणाले, “भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश असून ही लोकशाहीची जननी आणि विविधतेची भूमी आहे.सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारत नेहमीच सहिष्णुता, संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देतो.” भारत आणि सौदी अरेबियामधील संबंधांचे कौतुक करताना डोवाल म्हणाले, “हे संबंध सामायिक सांस्कृतिक वारसा, समान मूल्ये आणि आर्थिक संबंधांमुळे टिकून आहेत.”
काय आहे मुस्लिम वर्ल्ड लीग (MWL)?
मुस्लिम वर्ल्ड लीग (MWL) ही जगभरातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारी एक प्रभावशाली संस्था आहे. सौदी अरेबिया आणि इतर अनेक मुस्लिम-बहुल देशांनी एकत्र येऊन 1962 मध्ये या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे मुख्यालय मक्का, सौदी अरेबिया येथे आहे. १२० हून अधिक देश या संघटनेचे सदस्य आहेत, त्यामध्ये ६० हून अधिक मुस्लीम राष्ट्रे आहेत.
'मुस्लिमांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि इस्लामचा शांती संदेश जगभर पसरवणे' हे 'मुस्लिम वर्ल्ड लीग'चे प्रमुख ध्येय आहे. गरजू मुस्लिम समुदायांना मानवतावादी दृष्टीकोनातून तातडीची मदत मिळवून देणे, आंतरधर्मीय संवादाला चालना देणे, अतिरेकी विचारांशी आणि दहशतवादाशी लढा देणे आणि शिक्षण आणि विकास प्रकल्पांना मदत करणे, अशा इतर मानवतावादी पैलूंवरही ही संघटना काम करते.