अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या कर (टॅरिफ) चर्चेबाबत सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटल, "नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन डीसी यांच्यातील करांबाबत सर्व काही चांगलं होईल.”
काल न्यू जर्सीच्या अमेरिकी वकिलांच्या शपथविधी सोहळ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.
ट्रम्प म्हणाले, "पंतप्रधान मोदी नुकतेच इथे आले होते आणि आमचं नेहमीच चांगलं नातं राहिलं आहे. भारत हा जगात सर्वाधिक कर लावणारा देश आहे. ते खूप हुशार आहेत. मोदी हे खूप हुशार व्यक्ती आणि माझे चांगले मित्र आहेत. आमची चर्चा चांगली झाली. मला वाटतं भारत आणि अमेरिकेत सगळं चांगलं होईल. मी हेही सांगतो की भारताकडे एक उत्तम पंतप्रधान आहेत."
नवीन कर धोरणाची घोषणा
या आठवड्यात ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधून एक मोठी घोषणा केली. त्यांनी अमेरिकेत येणाऱ्या सर्व आयात वाहनांवर २५ टक्के कर लावण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय त्यांनी देशांतर्गत उत्पादनासाठी खूप रोमांचक असल्याचं म्हटलं. हा कर २ एप्रिलपासून लागू होणार आहे आणि याचा परिणाम अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या जवळपास निम्म्या वाहनांवर होईल. यात परदेशात बनवलेली अमेरिकी ब्रँडची वाहनंही असतील. या निर्णयामुळे वाहन कंपन्यांना अमेरिकेतच उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
याआधी अनेकदा ट्रम्प यांनी भारतावर टीका केली होती. ते म्हणाले होते, "भारतात सर्वाधिक कर आहेत आणि तिथे व्यवसाय करणं कठीण आहे. लवकरच भारत आणि चीनसारख्या देशांवर परस्पर कर (reciprocal tariffs) लावले जातील.
ट्रम्प म्हणाले, "आम्ही लवकरच परस्पर कर लावणार आहोत. ते आमच्या मालावर कर लावतात, आम्ही त्यांच्या मालावर लावू. भारत किंवा चीन जसा कर लावतात, आम्हीही तेच करू. हे आम्ही याआधी कधी केलं नाही. कोविड येण्याआधी आम्ही याची तयारी करत होतो."
त्यांनी भारताच्या वाहन आयातीवरील करांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, "भारत आमच्याकडून वाहनांवर 100% पेक्षा जास्त कर लावतो."
अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सत्रात बोलताना ट्रम्प यांनी सांगितलं की, हा परस्पर कर 2 एप्रिलपासून लागू होईल. ते म्हणाले, "गेल्या अनेक दशकांपासून जवळपास प्रत्येक देशाने अमेरिकेची फसवणूक केली आहे. आता हे आम्ही खपवून घेणार नाही." त्यांनी युरोपियन युनियन, चीन, ब्राझील आणि मेक्सिको यांच्यावर लावलेल्या करांचाही उल्लेख केला आणि इतर देशांवरही त्यांच्या कृतीनुसार कर लावणार असल्याचं जाहीर केलं.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter