"माध्यमांनी सगळ्या घटनांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये," असे आवाहन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी गुरुवारी माध्यमांना केले. खान यांनी बिहारच्या राज्यपालपदाची शपथ घेण्याआधी काही तास राष्ट्रीय जनता दलाचे नेते (आरजेडी) लालूप्रसाद यादव यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती. यावरून माध्यमांत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर खान यांनी हे आवाहन केले आहे.
खान यांनी बुधवारी संध्याकाळी लालूप्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्याचप्रमाणे खान यांच्या शपथविधीलाही लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव उपस्थित होते.याघडामोडींवरून माध्यमांनी प्रश्न विचारला असता खान म्हणाले, "मला सांगा तुम्ही एखाद्या गावी गेलात व तेथे तुमच्या परिचयाचे कोणी असेल तर तुम्ही त्यांना भेटणार की नाही, त्याचप्रमाणे मी येथील माझ्या परिचितांना भेटलो, ज्यांना मी १९७५ पासून ओळखतो. यात काय गैर आहे हे मला समजतच नाही." या भेटीचे राजकीय अर्थ काढू नका, असे आवाहन खान यांनी यावेळी केले.
बिहारच्या राज्यपालपदाची शपथ
■ पाटणा : आरिफ महंमद खान यांनी गुरुवारी बिहारच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. बिहारच्या राजभवनामध्ये खान यांचा शपथविधी सोहळा झाला. पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. विनोद चंद्रन यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते, राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.