तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणावर बोलताना २६/११ च्या हल्ल्यातील जखमींना वाचवणारे तौफिक मोहम्मद.
मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या झाल्या आहेत. याच कारण ठरतयं २६/११ च्या हल्ल्याच्या मुख्य आरोपींपैकी एक असणाऱ्या तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण. ९ मार्चला रात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेने राणाला भारतात आणले. राणाचे प्रत्यार्पण हे भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याचं मोठं यश मानलं जात आहे.
मुंबईत नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटल, ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे याठिकानावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. २६/११ च्या या हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर शेकडो जन जखमी झाले होते. सेंट जॉर्ज हॉस्पिटल समोरील छोटू चायवाला म्हणून प्रसिद्ध असलेला मोहम्मद तौफीक शेख दहशतवादी हल्ल्यात थोडक्यात बचावला होता. या हल्ल्यात तौफिक यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले होते. नुकतीच त्यांनी राणाच्या प्रत्यार्पणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
फॅसेलिटी नको फाशी द्या - तौफिक मोहम्मद
तब्बल १६ वर्षांनंतर तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे. यावर देशातील विशेषतः मुस्लिम कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. २६/११ हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेले तौफिक मोहम्मद १६ वर्षानंतर पुन्हा माध्यमांच्या समोर आले आहेत. यावेळी तेदेखील असवस्थ असल्याचे दिसले. माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
तौफिक मोहम्मद म्हणाले, “सरकारने २६/११ च्या मुख्य आरोपींपैकी एक असणाऱ्या तहव्वूर ला कोणतीही फॅसेलिटी देऊ नये. तो हीरो नाही तर राक्षस आहे. २६/११ च्या हल्ल्यात कोणाचा आई, बहिण, भाऊ, वडील मारले गेले आहेत. त्याला कोणतीही सहानुभूती न देता वेगळी कोठडी न देता सरकारने त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. या दहशतवाद्याला सरकारने १५ दिवसाच्या आत फाशी द्यावी.”
पाकिस्तानला धडा शिकवा
तौफिक पुढे म्हणाले, “दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने वेगळा कायदा बनवला पाहिजे. पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना पाठीशी घालतोय. याचे दुष्परिणाम तिथल्या लोकांना भोगावे लागतात. राणाला अशी कठोर शिक्षा द्यावी की इतर दहशतवाद्यांनी भीतीने थरथर कापायला हवं.”
इस्लाम कोणालाही मारण्याची शिकवण देत नाही
दहशतवादी हा कोणत्याही जाती धर्माचा नसतो. त्याला दहशतवादी म्हणूनच सर्वांनी ओळखलं पाहिजे. तौफिक म्हणतात, “राणाचा आणि माझा धर्म एक आहे. राणाने धर्माच्या नावाचा वापर करून सामान्य नागरिकांवर गोळ्या झाडणाऱ्यांना मदत केली. इस्लाम कोणालाही मारण्याची शिकवण देत नाही. इस्लाम हा शांती आणि प्रेमाचा संदेश देणारा धर्म आहे. धर्माच्या नावाखाली हिंसा करणं ही धर्माची शिकवण नाही. आम्हाला भारतीय मुसलमान असल्याचा अभिमान आहे. कोणत्याही दहशतवाद्याला कोठर शिक्षा मिळाली पाहिजे.”
लोकांचे प्राण वाचवणारे तौफिक
पाकिस्तानी दहशतवादी लोकांना निर्दयीपणे मारत होते. संपूर्ण स्टेशन सुन्न पडलं होतं. लोकांचे जीव जात होते. त्यांना वाचवण्यासाठी कोणी नव्हत. या परिस्थितीविषयी तौफिक सांगतात, “त्यांच्याकडे असणाऱ्या बंदुकांना बघून सुरुवातीला मला कमांडो आहेत का असं वाटलं. पण ते निर्दयीपणे लोकांना मारत होते. ती माणसं नाही तर राक्षसं होती. त्यातील एक जण (कसाब) माझ्याच दिशेने येत होता. त्याने मला शिव्या दिल्या. मी पण मारणार असं मला वाटलं होतं.”
पुढे ते सांगतात, “गोळीबारामुळे स्टेशनमधील काचा तुटल्या होत्या. संपूर्ण स्टेशन रक्ताने भरलं होतं. लोक जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते. अनेक लोक जखमी झाले होते. मला जखमी लोकांना वाचवायचे होते. मी जखमी लोकांना वाचवण्यासाठी हातगाडीचा वापर केला. लोकांना हातगाडीवर झोपवून सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आणि भायखळाच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले.”
हा प्रसंग अंगावर काटा आणणारा असला तरी तौफिक यांनी मोठ्या धैर्याने परिस्थिती सांभाळली. त्यांनी मानवतेला सर्वोतोपरी मानून जात धर्म न बघता नागरिकांचे प्राण वाचवले. यासाठी त्यांना २७ पुरस्कार आणि काही आर्थिक मदत देण्यात आली होती.
राणाच्या प्रत्यार्पणाचे मुस्लिम संघटनांकडून स्वागत
देशभरातील मुस्लिम विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाचे स्वागत केलं आहे. राणाला फाशीची शिक्षा देत दहशतवादाला आळा बसवण्याची विनंती मुस्लिम समाजाने केंद्र सरकारला केली आहे.
२६/११ च्या हल्ल्याविषयी
या हल्ल्याविषयी तौफिक सांगतात, “२६/११ च्या रात्री मी चहाचे पैसे आणण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेलो होतो. ४००० पेक्षा जास्त लोक त्याठिकाणी होते. तिकीट काढण्यासाठी गर्दी असल्याने तिकीट मास्टरने मला काही वेळाने पैसे घेऊन जाण्यास सांगितले. त्यांचं ऐकून मी रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभा राहिलो. मला आजही आठवतं त्या दिवशी भारत आणि इंग्लंडची क्रिकेट मॅच सुरू होती. काही वेळाने अचानक रेल्वे स्थानाकाच्या आत मधून फटाक्यांचा आवाज आला.”
पुढे ते म्हणतात, “फटाक्यांचा आवाज आल्यानंतर सुरुवातीला मी जास्त लक्ष दिलं नाही. पण हळूहळू आवाज वाढत होता. तेव्हा मी पटकन रेल्वे स्थानकात गेलो आणि तिकीट मास्टरांना सांगितलं गेट लावून घ्या कोणीतरी बॉम्ब फोडत आहे. त्यावर त्यांनी मला सांगितलं अशी चेष्टा करू नकोस पोलिस मारतील. मी त्यांना म्हटल चेष्टा नाही करत, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे.”
यानंतर तौफिक यांनी पोलिसांना फोन करत हल्ल्याची माहिती दिली. या स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात अजमल अमीर, कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग होता. या दहशतवाद्यांनी स्टेशनवर बेधुंद गोळीबार केला होता. यामध्ये ५८ लोकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी अजमल अमीर कसाबला पकडलं होतं पण त्यांच्या दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला होता.