पुण्यात साजरी होणार डीजेमुक्त ईद ए मिलाद

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 12 h ago
सिरत कमिटीचे सदस्य
सिरत कमिटीचे सदस्य

 

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुण्यात मोठ्या उत्साहात विविध सण साजरे गेले जातात. गतवर्षी प्रमाणे या वर्षीही गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी चा जुलूस एकत्र आले होते. पुण्यातील मुस्लिम बांधवांनी यावर्षीही पैगंबर जयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणारा जुलूस पुढे ढकलून धार्मिक सलोख्याचा संदेश दिला आहे. इस्लामने सांगितलेल्या सद्भाव आणि समन्वयाच्या  शिकवणीचे अनुकरण करत  पुण्याच्या सिरत कमिटीने आणि जिल्ह्यातील २०० हून अधिक  मस्जिदींच्या प्रमुखांनी एकत्र येत २१ सप्टेंबर रोजी उद्या जुलूस काढण्याचा निर्णय घेतला.

काल (दि. २०)तसेच पुण्याच्या पी ए इनामदर विद्यापीठाच्याआझम कॅम्पसमध्ये येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी पुणे शहरातील शेकडो मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जुलूसशी निगडीत एक कौतुकस्पद आणि अनुकरणीय निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  

...अन् असा झाला निर्णय
महाराष्ट्रात धार्मिक सण धार्मिक सौहार्द जपत साजरे केले जातात.नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव हिंदू मुस्लिम ऐक्याची अशी अनेक उदाहरणे पहायला मिळाली. दुसरीकडे, गेल्या दोन वर्षांपासून गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंतीचा जुलूस एकाच तारखेला आले.. मात्र  पुण्याच्या पोलिस प्रशासनाच्या  विनंतीला मान देत पुण्यातील मुस्लिमांनी गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही ईद ए मिलादचा जुलूस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.  

या निर्णयाविषयी बोलताना मौलाना इरफान अश्रफ सांगतात, “गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव सहभागी होत असतात. तर मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी होतात. इतक्या मोठ्यासंख्येला संभाळणे प्रशासनाला अवघड जाईल. समाजात सुख शांती नांदावी हीच मुस्लिम समाजाची भूमिका आहे. म्हणून आम्ही जुलूस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.” 

सिरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद कादरी यावर म्हणाले, “हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये भाईचारा टिकून रहावा आणि आपली सौहार्दाची संस्कृति जपली जावी म्हणून आम्ही सर्वांनी १७ तारखेचा जुलूस २१ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला.”    

मुस्लीम धर्मगुरूंनी घेतला आणखी एक कौतुकास्पद निर्णय
पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरे करण्याची आपली परंपरा आहे. मात्र अलीकडे ही परंपरा लुप्त होऊन सणांनी विकृत स्वरूप धारण केले आहे.  त्यात  कर्णकर्कश डीजे आणि त्यावरील बीभत्स गाणी आणि नाच यांनी मोठी भूमिका बजावली.  आज याच डीजेच्या गाण्यांवर तरुणाई जल्लोष करताना दिसते. डिजेचा असणार कर्कश आवाज, लेझर लाइटिंग यामुळे सामान्य जनतेला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याचा विचार करून मुस्लिम धर्मगुरूंनी डीजेमुक्त ईद ए मिलाद साजरी करण्याचा निर्णय घेतला.

डीजेवर बंदी घालण्याच्या निर्णयावर मौलाना गुलाम अहमद कादरी म्हणाले, “सध्या मोठ्या प्रमाणात युवक डीजेकडे आकर्षित होतात. मात्र गैरकृत्ये कृत्य करणे किंवा डीजे लावून पैगंबर जयंती साजरी करणे इस्लामला मान्य नाही.”

ते पुढे म्हणाले, “ज्या मार्गावरून जुलूस निघतो तिथे अनेक रुग्णालये आहेत.  डीजेच्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होतो, तर रुग्णांची काय अवस्था होत असेल? त्यामुळे आम्ही यंदापासून डीजेमुक्त जुलूस काढण्याचा निर्णय घेतला.  डीजेमुळे पैसे वाया जातात. याच पैशांचा जर व्यवस्थित वापर केला तर अनेक गरुजुंना मदत मिळू शकते. काल आम्ही मोमीनपुऱ्यामध्ये एका मंडळाला भेटलो. त्या मंडळाने डीजेचे पैसे वाचवून ३००० गरजूंनाजेवण दिले. सर्वांनी याचे अनुकरण केले पाहिजे.”

स्थानिक पातळीवरील नागरिकांना देखील डीजेमुक्त जुलूसमध्ये सहभागी व्हावे आणि पारंपारिक पद्धतीने व शांतीपूर्वक मुस्लिमांनी पैगंबरांची जयंती साजरी करावी, असे आवाहन  करण्यात आले आहे. 

मुस्लिम समाजाचा देशवासियांना संदेश 
गुलाम अहमद कादरी सांगतात, “यंदाची मिरवणूक डीजेमुक्त आणि शांतता पूर्वक करून संपूर्ण देशासमोर आदर्श निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. येत्या काळात जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी डीजेमुक्त जुलूस कडून समाजात शांतता जपावी. इस्लामच्या शर्यतीवर चालून पारंपरिक पद्धतीने प्रेषितांची जयंती साजरी करावी.” 

असा आहे जुलुसचा मार्ग 
दरवर्षी मुस्लिम समाज बांधव पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढत असतात. मात्र यावर्षीपासून डीजे मुक्त पैगंबर जयंती करण्याचा निर्णय झाला आहे. या जुलुसच्या मार्गाविषयी बोलताना गुलाम अहमद कंदरी सांगतात, “पैगंबर जयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या जुलूसला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. याचा मार्ग म्हणजे मनुशाह मस्जिद येथून जुलूस सुरू होऊन  एडी कॅम्प चौक, निशांत थेटर, भगवानदास चाळ, मुक्तीफौज चौक, शिवाजी मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, कुरेशी मस्जिद एमजी रोड, महावीर चौक, साचापीर स्ट्रीट, क्वार्टर गेट चौक, लक्ष्मी रोड, संत कबीर चौक मार्गे गणेश पेठ हमजे खान चौक. तेथून डावीकडे रांका ज्वेलर्स ते उजव्या हाताला असलेल्या बागवान मस्जिद, सुभान शहा दर्गा चौक, जामा मस्जिद असा असेल. जामा मस्जिद येथे जोहर नमाजच्या वेळी सिरत कमिटीच्या पदाधीकऱ्यांच्या उपस्थितीत दोन वाजता मिरवणुकीचे समारोप होईल.” 

सामाजिक सलोखा जपण्यासाठी आणि हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी सिरत सोबत मुस्लिम समाजाने घेतलेला निर्णय सर्वांसाठीच अनुकरणीय आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter