मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो... हे वाक्य कानी पडताच आझाद मैदानावर उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकल्यानंतर आज आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.
अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
येत्या बुधवारी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मुंबई येथील आझाद मैदानात झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह २२ राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. सुमारे दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. उद्योग, चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. अंबानी कुटुंबीयांना पहिल्याच रांगेत स्थान देण्यात आले होते.
त्यांच्यामागील रांगेत मर्चंट कुटुंबीय, कुमार बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, अभिनेते शाहरूख खान, सलमान खान यांच्यासह माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, दिलीप संघवी, अनिल अंबानी, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेंद्र सराफ, अनिल काकोडकर आदी मान्यवर स्थानापन्न झाले होते. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही अखेर आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
आज दिवसभर राजकीय वर्तुळात शिंदे यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आणि शिवसेनेच्या आमदारांची मागणी मान्य करत शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांनी २०१४-२०१९ या काळात प्रथम महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, त्यानंतर राज्य सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून काम केले.
उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येदेखील ते नगरविकास मंत्री होते. यानंतर शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले होते. आता फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले आहेत.
पहिली सही अन् पुण्यातील रुग्णाला मोठी मदत
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या फाइलवर केली. या पहिल्या सहीमुळे पुण्यातील रुग्णाला पाच लाख रुपयांची मदत झाली आहे. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाइलवर सही करताना दिले. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्स्प्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अर्थसाह्य देण्याची विनंती केली होती.
देवाभाऊंचा संदेश
मराठा समाजाला निश्चितपणे न्याय देणार
जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार
निकषांत बसणाऱ्यांनाच ‘लाडकी बहीण’चे लाभ ‘लाडकी बहीण’चे मानधन २,१०० रुपये करणार
९ तारखेला अध्यक्षांच्या निवडीसाठी पत्र देऊ
सरकार स्थापनेला कोणताही विलंब नाहीच
राजकीय संस्कृतीवर सर्व पक्षांनी विचार करावा
मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पूर्ण
एकनाथ शिंदे हे कधीही नाराज नव्हते
माझ्या विनंतीनंतर शिंदे उपमुख्यमंत्री बनले
मंत्रिपदे देताना आधीची कामे पाहणार
मुंबई- गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
७, ८ आणि ९ तारखेला विधिमंडळाचे अधिवेशन
विरोधी नेतेपदाबाबत विधानसभाअध्यक्ष निर्णय घेणार
ते मिथक मोडीत निघाले
उपमुख्यमंत्री झालेली व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होत नाही, हे मिथक देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीमुळे खोटे ठरले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे पवार यांना एकदाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही, तर फडणवीस यांनी एकदा हा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे अभिनंदन. या टीमध्ये अनुभव आणि कामाची गतिशीलता दिसून येते. या टीममुळे राज्यात महायुतीला एवढे भव्य यश मिळाले. ही टीमच राज्यातील लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल. केंद्रही महाराष्ट्राच्या विकासाला सर्वतोपरी मदत करेल."