आदिलच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आर्थिक मदत

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 10 h ago
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सय्यद आदिल हुसैन शाह
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सय्यद आदिल हुसैन शाह

 

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवलं. याच हल्ल्यात अनंतनागच्या हपतनार गावातला २० वर्षांचा सय्यद आदिल हुसैन शाहने आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दहशतवादी हल्ल्यात त्याला वीरमरण आलं. त्याच्या या धाडसाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

सय्यद आदिल हा पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांना घोड्यावरून फिरवायचा. तो त्याच्या कुटुंबातला एकमेव कमावता सदस्य होता. त्याच्या कमाईवर आई-वडील आणि दोन लहान भावंडांचा उदरनिर्वाह चालायचा. हल्ल्याच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे पर्यटकांना घेऊन बैसरन खोऱ्यात गेला होता. यावेळी दहशतवादी पोलिसांच्या वेशात आले. त्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाले. 

या हल्ल्यावेळी आदिलने पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी दोन हात केले. ‘हे आमचे पाहुणे आहेत, त्यांना सोडा असं म्हणत त्याने एका दहशतवाद्याची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या दहशतवाद्याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आदिल शेवटच्या श्वासापर्यंत लढला, पण त्याला वीरमरण आलं. त्याच्या धाडसाने अनेक पर्यटकांचे प्राण वाचले. जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं, "आदिलने दहशतवाद्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला जीव गमवावा लागला."

उपमुख्यमंत्र्यांची आर्थिक मदत 
पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक कश्मीरमध्ये अडकले होते. त्यांच्या सुटकेसाठी एकनाथ शिंदे २३ एप्रिलला श्रीनगरला गेले. तिथे त्यांना आदिलच्या शौर्याची माहिती मिळाली. त्याच्या बलिदानाने प्रभावित होऊन शिंदेंनी तातडीने त्याच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत जाहीर केली. काल शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिलच्या कुटुंबाला हा धनादेश सुपूर्द केला. स्थानिक आमदार सईद रफीक शाह यावेळी उपस्थित होते.

शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आदिलच्या कुटुंबाशी बोलताना त्यांना धीर दिला. ते म्हणाले, "आदिलने माणुसकीचं अनोखं उदाहरण दाखवलं आहे. पर्यटकांना वाचवण्यासाठी तो दहशतवाद्यांशी लढला. त्याच्या या कृतीमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले. त्याचं बलिदान वाया जाणार नाही. त्याच्या कुटुंबाचं घर पुन्हा बांधण्यासाठी आम्ही मदत करू."  

आदिलच्या कुटुंबाची व्यथा
आदिलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाचा आधार गमावला आहे. त्याचे वडील सय्यद हैदर शाह यांनी सांगितलं, "आदिल रोजच्या प्रमाणे पर्यटकांसोबत गेला होता. त्यादिवशी दुपारी तिन वाजता दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली. मी लगेच आदिलला कॉल केला. परंतु त्याचा फोन बंद लागत होता. यानंतर मी पोलिस ठाण्यात गेलो तेव्हा पोलिसांनी सांगितलं आदिलचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.”

तर आदिलच्या आई म्हणतात, “आदिल आमचा एकमेव आधार होता. तो रोज पर्यटकांसोबत जाऊन घर आणि कुटुंब सांभाळायचा. आता तो आमच्यासोबत नाही. आमचं काय होणार आता?” आदिलच्या आजी खांदा परवीन यांनीही सरकारकडून दीर्घकालीन मदतीची मागणी केली आहे. 

नुकतेच आदिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अंत्यविधिला जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला उपस्थित होते. यावेळी त्यांनी आदिलच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter