दाराशिकोह सांस्कृतिक सौहार्दाचे प्रतीक - संघ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
RSS महासचिव दत्तात्रेय होसाबळे.
RSS महासचिव दत्तात्रेय होसाबळे.

 

मागील काही दिवसांपासून नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण सुरू आहे. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसाबळे यांनी रविवारी ‘गंगा-जमुना संस्कृती’च्या पुरस्कर्त्यांवर टीका केली. होसाबळे म्हणाले की, यापूर्वी अशा लोकांनी मुघल सम्राट औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह नायक म्हणून कधीच मान्यता दिली नाही. दारा शिकोह हा मुघल सम्राट शाहजहानचा मोठा मुलगा होता. तो सांस्कृतिक समरसतेच्या प्रचारकांपैकी एक होता. 

होसाबळे म्हणाले, “दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामकरण डॉ. अब्दुल कलाम रोड करण्यात आले. त्याची वेगळी कारणे होती. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह याला नायक बनवण्यात आले नाही. गंगा-जमुना संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी दारा शिकोह यांना पुढे आणण्याचा विचार कधीच केला नाही.” 

पुढे ते म्हणाले, “आपण अशा व्यक्तीचे प्रतीक बनवू जो भारताच्या संस्कृतीच्या विरोधात होता. या भूमीच्या परंपरेनुसार काम करणाऱ्यांसोबत जाऊ? स्वातंत्र्याची लढाई ब्रिटिशांविरुद्ध लढली जात असेल तर ती स्वातंत्र्याची लढाई आहे. त्यांच्या आधी आलेल्यांविरुद्ध, म्हणजेच इंग्रजांपूर्वीचा लढा हा देखील स्वातंत्र्याचा लढा होता. महाराणा प्रताप यांनी जे केले ते स्वातंत्र्यासाठीचा लढा होता. जर आक्रमक मानसिकतेचे लोक असतील तर ते देशासाठी धोका आहेत. आपल्या देशाच्या संस्कृतीशी आपण कोणाला जोडणार आहोत हे आपण ठरवायचे आहे, असे स्पष्ट करत हा धर्माचा विषय नाही. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ठाम दृष्टिकोन आहे.”  

दारा शिकोह कोण होता?
दारा शिकोह हा मुघल सम्राट शाहजहानचा मोठा मुलगा होता. त्याला लिबरल मुस्लीम म्हणून ओळखले जाते. याचे कारण त्याने हिंदू आणि इस्लामिक परंपरांमधील समानता शोधण्याचा प्रयत्न केला.

दारा शिकोहला १६५५ मध्ये युवराज म्हणून घोषित करण्यात आले होते. पण १६५७ मध्ये औरंगजेबाने त्याला हरवले. १६५९ मध्ये औरंगजेबाच्या आदेशावर त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा त्याचे वय ४४ वर्षे होते. 

मजमा उल-बहरैन आणि सिर्र-ई-अकबर यांसारख्या ग्रंथ त्याने लिहले. या ग्रंथांमध्ये हिंदू आणि इस्लाममधील संबंध उलगडण्याचा प्रयत्न केला. दारा शिकोहने उपनिषदांसह इतर हिंदू ग्रंथांचा संस्कृतमधून फारसीत भाषांतर केले. यामुळे भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिकतेची ओळख युरोप आणि पश्चिम देशांपर्यंत झाली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter