महाराष्ट्र शासनाकडून वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

राज्य सरकारने राज्य वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी 10 कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. निवडणूकी प्रचारादरम्यान महायुती सरकारमधील प्रमुख पक्ष भाजपने वक्फ जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसंच वक्फ बोर्डावर अनेक नेते टीका करत होते, मात्र, निवडणूक निकालानंतर महायुती सरकारने तातडीने वक्फ बोर्डाचं कामकाज आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी निधी मंजूर केला आहे, त्यामुळे आता या निर्णयाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

शासन निर्णयानुसार 2024-25 वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून 2 कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित करण्यात आले आहे. तर आता 10 कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा निधी देण्यात येणार आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रंचड बहुमत मिळाले आता काही दिवसांत सरकारही स्थापन होणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे. दरम्यान, इकडे मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्यापूर्वी किंवा सरकार स्थापन होण्यापूर्वीच एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार वक्फ बोर्डाला हा निधी देण्यात येत आहे.

दरम्यान सरकारच्या या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. ‘काँग्रेस सरकारने जे केले नाही ते महायुतीचे सरकार करत आहे. सरकार धार्मिक समाजाला खूश करत आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महायुतीला हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा विहिंपचे कोकण विभागाचे सचिव मोहन सालेकर यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिला होता.

वक्फ बोर्ड म्हणजे काय?
वक्फ कायदा हा मुस्लिम समाजाच्या मालमत्ता आणि धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन आणि नियमन करण्यासाठी बनवलेला कायदा आहे. वक्फ बोर्ड हे वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन करते. ही कायदेशीर संस्था आहे. प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहे. वक्फ बोर्डामध्ये मालमत्तांची नोंदणी करणं बंधनकारक आहे. हे बोर्ड मालमत्तांची नोंदणी, व्यवस्थापन आणि संवर्धन करते. राज्यांमध्ये बोर्डाचं नेतृत्त्व त्याचे अध्यक्ष करतात. देशात शिया आणि सुन्नी असे दोन प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter