‘इस्रो’ने अंतराळात काउपियाच्या बियांना अंकुर फुटले असल्याचे घोषित केले आहे. ‘पीएसएलव्ही-सी ६०’द्वारे अंतराळात पाठविलेल्या बियांमध्ये शून्य गुरुत्वाकर्षणात अंकुर फुटल्याने संशोधनासाठी नवीन आशा निर्माण झाल्या आहेत.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज मोठे यश मिळविले असून ‘पीएसएलव्ही-सी ६० पीओईएम-४’ च्या माध्यमातून अंतराळात पाठविलेल्या काउपियांच्या बियांना अंकुर फुटले आहेत.
या प्रयोगासाठी ‘ऑर्बिटल प्लँट स्टडीज’साठी (सीआरओपीएस) विकसित करण्यात आलेल्या ‘कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल’चा वापर करण्यात आला होता. जवळजवळ शून्य गुरुत्वाकर्षण शक्ती असलेल्या वातावरणामध्ये काउपियाच्या बियांना अंकुर फुटल्याने संशोधकांच्या आशा बळावल्या आहेत.
अवकाशामध्ये वनस्पतींची वाढ नेमकी कशा पद्धतीने होते? हे या प्रयोगाच्या माध्यमातून समजू शकेल असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ‘सीआरओपीएस’ ही प्रणाली विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने विकसित केली असून ती बियांना नेमके कशा पद्धतीने अंकुर फुटतात आणि जवळपास शून्य गुरुत्वाकर्षण शक्ती असलेल्या स्थितीमध्ये त्यांची नेमकी कशा पद्धतीने वाढ होते? याचा सखोल अभ्यास करते. या प्रयोगासाठी काउपियाच्या अठरा बिया एका बंदिस्त पेटीमध्ये यानातून अवकाशात पाठविण्यात आल्या होत्या त्याला थर्मल यंत्रणेची जोड देण्यात आली होती. पृथ्वीच्या बाहेर देखील वनस्पतींची वाढ होण्यास पोषक वातावरण तयार व्हावे असा संशोधकांचा प्रयत्न होता.
तापमान, ओलाव्यावर लक्ष
या प्रयोगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. यासाठी रिअल टाइम डेटा गोळा करण्यात आला होता. या यंत्रणेतच हाय-रिझॉल्यूशन इमेजिंग कॅमेरा बसविण्यात आला होता. त्या माध्यमातून ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या प्रमाणावरही लक्ष ठेवण्यात आले होते. पेटीतील आर्द्रतेचे मोजमाप करण्याबरोबरच तापमान आणि मातीमधील ओलावा यावर देखील नजर ठेवण्यात आली होती.
प्रकल्पाचा उद्देश
अवघ्या चारच दिवसांमध्ये काउपियाच्या बियांना मोड फुटले असून लवकरच त्याला पाने फुटण्याचीही शक्यता आहे. अवकाश संशोधनातील हा मैलाचा टप्पा असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. पृथ्वीच्या बाहेरील वातावरणामध्ये चिरंतन शेती कशा पद्धतीने करता येईल? त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना आखाव्या लागतील? याचा अभ्यास करण्यासाठीच ‘सीआरओपीएस’ हा प्रकल्प आखण्यात आला होता.
या प्रयोगाचा मोठा लाभ भविष्यातील अंतराळ मोहिमांना होणार असून दीर्घकालीन मोहिमांमध्ये हे तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते तसेच अन्य ग्रहांवरील मानवी अस्तित्वाला देखील त्यामुळे बळ मिळू शकेल. अवकाशातील कृषी प्रयोगांसाठी ‘इस्रो’चे संशोधक आग्रही असून त्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयोग सुरू आहेत. हा प्रयोग त्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. पृथ्वीच्या बाहेर प्रतिकूल वातावरणामध्ये देखील जीवन फुलू शकते हे या प्रयोगामुळे सिद्ध झाले आहे.