तुम्हाला सतत येणाऱ्या अनावश्यक फोन आणि मेसेजेसवर आता चांगलीच चाप बसणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) आपल्या २०१८च्या टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रिफरन्स रेग्युलेशन्स (TCCCPR) मध्ये १२ फेब्रुवारीला काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या नव्या नियमांमुळे स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसवर नियंत्रण आणणे सोपे होणार आहे. याविषयीची माहिती संचार आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी लोकसभेत दिली.
नवे नियम काय असणार
TRAI ने नव्या नियमांमध्ये काही मोठे बदल केले आहेत. आता तुम्हाला स्पॅम कॉल किंवा मेसेज आला तर त्याची तक्रार करण्यासाठी पूर्वी ३ दिवसांचा वेळ होता परंतु आता ७ दिवसांचा कालावधी करण्यात आला आहे. म्हणजे तुम्हाला आता तक्रार करायला थोडा जास्त वेळ मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या कंपन्या किंवा व्यक्ती नोंदणी न करता (अनरजिस्टर्ड टेलिमार्केटर्स) हे स्पॅम कॉल्स करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मुदत ३० दिवसांवरून ५ दिवसांवर आली आहे. याचा अर्थ आता तक्रारीनंतर फक्त ५ दिवसांतच त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
याशिवाय स्पॅम करणाऱ्यांवर कारवाईचा नियमही कडक करण्यात आला आहे. याआधी एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीवर ७ दिवसांत १० तक्रारी आल्या तरच कारवाई व्हायची. आता हेच अंतर १० दिवसांत ५ तक्रारी असे झाले आहे. हे सगळे बदल १२ मार्चनंतर लागू होतील, पण काही नियम १२ एप्रिलनंतर लागू होणार आहेत, असं TRAI ने सांगितले.
स्पॅम कॉल्सवर कडक कारवाई
TRAI ने गेल्या वर्षी १३ ऑगस्टमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी सर्व टेलिकॉम कंपन्यांना सांगितलं की, जे लोक किंवा कंपन्या नोंदणीकृत नाहीत (अनरजिस्टर्ड टेलिमार्केटर्स) आणि स्पॅम कॉल्स करत आहेत, त्यांचे फोन नंबर आणि इतर सुविधा तातडीने बंद करा आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करा. या निर्णयामुळे मोठी कारवाई झाली. ऑगस्ट २०२४ मध्ये स्पॅम कॉल्सच्या १,८९,४१९ तक्रारी होत्या, त्या जानेवारी २०२५ मध्ये १,३४,८२१ वर आल्या. म्हणजे जवळपास ५४,५९८ तक्रारी कमी झाल्या. याशिवाय, १,१५० पेक्षा जास्त लोक आणि कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आणि १८.८ लाखांहून जास्त फोन नंबर बंद करण्यात आले.
या नव्या नियमांमुळे सामान्य माणसाला खूप फायदा होणार आहे. तुम्हाला सतत येणारे जाहिरातींचे फोन किंवा मेसेजेस आता कमी होतील. जर कोणी तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही फक्त तुमचा नंबर, ज्याने फोन केला तो नंबर, तारीख आणि थोडक्यात माहिती देऊन तक्रार करू शकता. टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या अॅप्स आणि वेबसाइटवर तक्रार करण्याची सोय ठेवावी लागेल. इतकंच नाही, तर तुमच्या फोनमधून कॉल लॉग आणि मेसेजेस आपोआप तक्रारीत जोडता येतील किंवा स्क्रीनशॉटही वापरता येतील. यामुळे तक्रार करणं खूप सोपं झालं आहे.