भारतीय राज्यघटनेला २६ जानेवारी २०२५ ला ७५ वर्षे पूर्ण होत असून, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात केले. राज्यघटना सर्वांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' च्या ११७ व्या भागामध्ये देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत राज्यघटना, महाकुंभ, भारतीय संस्कृती, आणि आरोग्य विषयक विविध मुक्ांवर चर्चा केली. पंतप्रधानांनी सांगितले की, नव्या वर्षांत २६ जानेवारीला आपल्या राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण होतील. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपली राज्यघटना ही आपल्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. "राज्यघटनेच्या वारशाशी नागरिकांना जोडण्यासाठी constitution75. com हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना या संकेतस्थळावर जाऊन राज्यघटनेची प्रस्तावना वाचावी आणि आपले व्हिडिओ अपलोड करावेत," असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी केले.
मनोरंजन क्षेत्रातील योगदान आणि नव्या संधीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी राज कपूर, महम्मद रफी, अक्किनेनी नागेश्वर राव, आणि तपन सिन्हा यांसारख्या दिग्गज कलाकारांचे स्मरण केले. तसेच २०२५ मध्ये होणाऱ्या 'वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट चीही घोषणा केली. यामध्ये जागतिक स्तरावरील माध्यम आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचे तज्ज्ञ सहभागी होतील, असे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, पंतप्रधानांनी भारतातील मलेरियाच्या नियंत्रणासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांवरही प्रकाश टाकला आणि 'आयुष्मान भारत योजने' मुळे कर्करोगावरील उपचार सुलभ झाल्याचेही नमूद केले.
कुंभमेळ्यात 'एआय'चा वापर
प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले. ते म्हणाले, "कुंभमेळ्यात लक्षावधी संत, अनेक समाजांचे प्रतिनिधी सहभागी होतात. यंदा पहिल्यांदाच एआय चॅटवॉटच्या मदतीने ११ भारतीय भाषांमध्ये कुंभ मेळ्याविषयची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. एआय पॉवर्ड कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण कुंभमेळा क्षेत्राचे चित्रीकरण केले जाईल, जेणेकरून एखादी व्यक्ती हरवल्यास लगेच तिचा शोध घेता येईल, असेही मोदी म्हणाले.
'बस्तर ऑलिंपिक ही क्रांती'
"ऑलिंपिक हे क्रांतीचे प्रतीक आहे. यातील अनोख्या खेळांमध्ये सात जिल्ह्यांतील १.६५ लाख खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धांनी उपक्रमामुळे बस्तरमधील तरुणांमध्ये उत्साह संचारला आहे, असे प्रतिपादन बस्तर ऑलिंपिकची चर्चा करताना पंतप्रधानांनी केले. कालाहांडीतील 'सब्जी क्रांती' चाही उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. ते म्हणाले, की ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील 'सब्जी क्रांती' हे उदाहरण म्हणून समोर ठेवता येईल. ते म्हणाले, "कालाहांडी जिल्ह्यातील गोलामुंडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आज हा भाग भाजीपाला उत्पादनाचे केंद्र बनला आहे." त्याचप्रमाणे, पंतप्रधानांनी तमीळ भाषेचा जगातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून उल्लेख केला आणि तिचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याबद्दलही आनंद व्यक्त केला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter